लोकशाही आणि घराणेशाही एकत्र नांदू शकत नाही; घराणेशाहीवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 11:36 AM2017-09-16T11:36:35+5:302017-09-16T11:39:58+5:30
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर मत मांडलं आहे.
नवी दिल्ली, दि. 16- भारतातील घराणेशाहीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अमेरिकेतील बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठात वक्तव्य केलं होतं. आता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर मत मांडलं आहे. घराणेशाही आणि लोकशाही एकत्र नांदू शकत नाही. तसंच घराणेशाही ही पूर्णपणे अयोग्य आहे. पण, आपल्याकडे काहीजण त्याचं समर्थन करतात, असं व्यंकय्या नायडू त्यांनी म्हटलं. मी हे एखाद्या पक्षाला किंवा व्यक्तीला उद्देशून बोलत नसल्याचंही व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं. काही दिवसांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात बोलताना भारतात असलेल्या घराणेशाहीबद्दल वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याला व्यंकय्या नायडू यांनी उत्तर दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Dynasty&democracy can't go together.Dynasty is nasty but tasty to some ppl. Not speaking about a party or person: Vice Pres M Venakiah Naidu pic.twitter.com/5pglBHSQUQ
— ANI (@ANI) September 16, 2017
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांना काँग्रेस पक्षातील घराणेशाहीबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी यांनी उत्तर दिलं होतं. 'एकट्या काँग्रेस पक्षालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता येणार नाही. देशातील अनेक पक्षात आजही घराणेशाही चालते. असं बोलताना राहुल गांधी यांनी अखिलेश यादव, करुणानिधी यांचा मुलगा स्टालिन तसंत अमिताभ बच्चन या सगळ्यांची उदाहरणं दिली होती. सगळीकडे घराणेशाही आहेच. एवढंच काय तर बॉलिवूड क्षेत्रात, व्यावसायिकांमध्येही घराणेशाही आहे. अभिषेक बच्चनपासून ते अंबानी कुटुंबियांपर्यंत सगळीकडे घराणेशाही पाहायला मिळते. इन्फोसिसही काही यापेक्षा वेगळे नाही, असं उत्तर राहुल गांधी यांनी दिलं.
राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. घराण्याचा वंशज आणि घराणेशाही या गोष्टी भारतीय व्यवस्थेचा अविभाज्य भाग असल्याचा त्यांचा दावा विसंगतीपूर्ण असल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटलं होतं. तर अभिनेते ऋषी कपूर यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. ऋषी कपूर यांनी सलग तीन ट्विट करत राहुल गांधी यांना झापलं. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'राहुल गांधी. 106 वर्षांच्या भारतीय चित्रपटसृष्टीत कपूर घराण्याचं योगदान 90 वर्ष आहे. प्रत्येक पिढीला लोकांनी मेरिटच्या आधारे निवडलं आहे'. यानंतर केलेल्या दुस-या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, 'देवाच्या कृपेने आमची चौथी पिढी आहे - पृथ्वीराज कपूर, राज कपूर, रणधीर कपूर आणि रणबीर कपूर. याशिवाय अजूनही'. असं ऋषी कपूर म्हणाले होते.