मोदींच्या मंत्रिमंडळात टाइम मॅगेझिनने गौरवलेला डिमॉलिशन मॅन   

By अोंकार करंबेळकर | Published: September 3, 2017 11:30 AM2017-09-03T11:30:47+5:302017-09-03T11:32:50+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात नवे बदल आज केले. विविध खात्यांना कोणते मंत्री लाभतील याची चर्चा गेला महिनाभर सुरू होती, मात्र एका नावाने आज सर्वांचेच लक्ष वेधून घेतले , ते नाव म्हणजे के. जे. अल्फोन्स कन्ननथनम. 

Demolition Man with Time Magazine honored in Modi's Cabinet | मोदींच्या मंत्रिमंडळात टाइम मॅगेझिनने गौरवलेला डिमॉलिशन मॅन   

मोदींच्या मंत्रिमंडळात टाइम मॅगेझिनने गौरवलेला डिमॉलिशन मॅन   

Next

मुंबई, दि.३ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात नवे बदल आज केले. विविध खात्यांना कोणते मंत्री लाभतील याची चर्चा गेला महिनाभर सुरू होती, मात्र एका नावाने आज सर्वांचेच लक्ष वेधून घेतले , ते नाव म्हणजे के. जे. अल्फोन्स कन्ननथनम. 
कन्ननथनन हे मोदी यांच्या मंत्रिमंडळातील पहिले व एकमेव केरळी मंत्री म्हणून ओळखले जातील. आजच्या फेरबदलापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात दक्षिणेचे मोजकेच मंत्री होते. त्यात तेलंगण आणि आंध्रचे व्यंकय्या नायडू, निर्मला सीतारामन, बंडारु दत्तात्रय, वाय. एस चौधरी आणि तेलगू देसमचे अशोक गजपती राजू यांचा समावेश होता. नायडू उपराष्ट्रपती पदावरती निवडले गेल्याने दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा नेता मंत्रिमंडळातून बाहेर पडला. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी बंडारू दत्तात्रेय यांचा राजीनामा घेण्यात आला. तामिळनाडूमधून कन्याकुमारीचे खासदार पी. राधाकृष्णन हे राज्यमंत्री बनवले गेले तर कर्नाटकातून जी.एम. सिद्धेश्वरा, रमेश चंद्राप्पा जिगजिनगी, अनंतकुमार, डी. व्ही. सदानंद गौडा मंत्री होते. कर्नाटकमधून उत्तर कन्नड जिल्ह्यातील अनंतकुमार हेगडे आज मंत्री झाले आहेत, तर कन्ननथनम यांच्या रुपाने प्रथमच केरळी व्यक्तीला मंत्रिपद मिळाले आहे. 
अल्फोन्स कन्ननथनम यांचा जन्म ८ आँगस्ट  १९५३ साली के. व्ही. जोसेफ आणि ब्रिजिथ जोसेफ यांच्या पोटी झाला. त्यांच्या वडिलांनी दुसऱ्या महायुद्धात लष्करी सेवा बजावली होती, महायुद्धानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यांना कन्ननथनम यांच्यासह नऊ अपत्ये होती तसेच त्यांनी दोन मुलांना दत्तक घेऊन त्यांचाही सांभाळ केला होता. कन्ननथनम यांनी केरळमध्येच शिक्षण पूर्ण केले. अर्थशास्त्रामध्ये त्यांनी प्रथम क्रमांकासह पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. १९७९ साली ते केरळ कँडरचे आयएएस झाले. १९८१ ते १८७३ या कालावधीत ते देविकोलमचे उपजिल्हाधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी केरळचे शिक्षणसचिव पद सांभाळले. १९८५ साली ते केरळ दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक बनले. १९८८ साली ते कोट्टयम जिल्ह्याचे कलेक्टर बनले. पुढच्याच वर्षी त्यांनी संपूर्ण कोट्टयम शहर १००% साक्षर बनवण्याचे  अभूतपूर्व कार्य केले, त्यामुळे त्यांचे देशभरात कौतुक केले गेले. त्यानंतर १९९२ साली त्यांच्याकडे दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे डीडीएच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली. कन्ननथनम यांची ही कारकीर्द विशेष गाजली. या पदावर असताना त्यांनी १४ हजार ३१० बेकायदेशीर इमारती जमिनदोस्त केल्या आणि १० हजार कोटी रुपयांची जमिन मोकळी करुन घेतली. त्यांच्या या धडाकेबाज कामामुळे त्यांना द डिमॉलिशन मॅन अशी नवी ओळखच मिळाली होती.१९९४ साली टाइम मॅगझिनने त्यांचा १०० यंग ग्लोबल लिडर्सच्या यादीत समावेश केला होता. त्यांनी केंद्रीय वाहतूक, उच्च शिक्षण आणि जमिन मसूल विभागांचे सचिवपदही सांभाळले. २००६ साली त्यांनी सनदी सेवेतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि ते राजकारणात आले. २००६ ते २०११ या कालावधीत ते कोट्टयम जिल्ह्यातील कांजिरापल्ली मतदारसंघातून डावी आघाडी पुरस्कृत अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले .२०११ साली ते भाजपात आले व पक्षाने त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनवले. आज कन्ननथनम हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य झाले आहेत. १९९४ साली त्यांनी जनशक्ती ही एनजीओ स्थापन केली तिच्या संपूर्ण केरळमध्ये २६५ शाखा आहेत. १९९६ साली त्यांनी लिहिलेलं मेकिंग ए डिफरन्स पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. 
ओ. राजगोपाल यांच्यानंतर कन्ननथनम 
भाजपाचा दक्षिणेकडील राज्यांमध्ये ताकद मर्यादित असल्यामुळे येथे पक्षाचे संसदेतही सदस्य कमी होते. यापुर्वी केरळचे ओ. राजगोपाल हे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सदस्य होते. त्यांनी संसदीय कामकाज, संरक्षण, नागरी विकास, कायदा, रेल्वे अशा अनेक मंत्रालयात १९९९ ते २००४ अशी सहा वर्षे राज्यमंत्रीपद सांभाळले. अर्थात ते मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडले गेले होते. १९९२ ते २००४ अशी बारा वर्षे ते राज्यसभेत होते. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत तिरुवनंतपुरम मतदारसंघात त्यांचा केवळ १५ हजार मतांनी पराभव झाला आणि काँग्रेसचे शशी थरुर विजयी झाले होते. २०१६ साली ते नेमाम मतदारसंघातून केरळ विधानसभेत निवडून गेले. केरळमध्ये भाजपाचे ते एकमेव आमदार आहेत. 

Web Title: Demolition Man with Time Magazine honored in Modi's Cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.