नवी दिल्ली - देशभरात 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. राजधानी दिल्लीत राजपथावर तिन्ही दलाने शक्तिप्रदर्शन करत तिरंग्याला मानवंदना दिली. देशातील अनेक राज्यांच्या संस्कृतीचं दर्शनही राजपथावर घडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री, लष्कराचे तिन्ही दलप्रमुख यांच्या उपस्थितीत झेंडावंदन पार पडले. राष्टपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. इंडो तिबेटिन सीमारेषेवर पोलिसांनी तिरंगा फडकवला. तब्बल 18 हजार फूट उंचीवर आणि - 30 अंश सेल्सियस एवढ्या थंड तपमानात पोलीस जवानांनी तिरंग्याला सलामी दिली.
राजपथावर 70 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा हे प्रमुख अतिथी म्हणून हजर राहिले आहेत. राजपथावरील चित्तथरारक कसरती पाहून नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. 9 मोटारसायकलीवर तब्बल 33 जणांनी ह्युमन पिरॅमीड तयार केला होता. या पिरॅमीड पथकाचे नेतृत्व सुभेदार मेजर रमेश यांनी केलं.