चेन्नई - एका महिलेने आपल्या पोटच्या सहा महिन्याच्या चिमुरड्याची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या मुलाला डेंग्यू झाला होता. मुलाचा उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने असहाय्य महिलेने पोटच्या मुलाची हत्या केली. तामिळनाडूमधील नमक्कल जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मृतांची ओळख पडली आहे. महिला बेलुकरुची येथील राहणारी असून पी अनबुकोडी असं त्यांचं नाव आहे. मुलाचं नाव सर्विन असं होतं. अनबुकोडी यांचा पती पेरियासामी यांचं सलून आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सर्विन आजारी पडला होता. अनबुकोडी आणि पेरियासामी त्याला घेऊन एका खासगी रुग्णालयात गेले होते. पेरियासामी यांच्या एका नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, मुलाची तपासणी केली असता त्याला डेंग्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, 'हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मुलाच्या उपचारासाठी दिवसाला चार हजार रुपये खर्च येईल असं सांगितलं होतं'.
अनबुकोडी आणि पेरियासामी सोमवारी रात्री 11 वाजता आजारी मुलाला घेऊन घरी परतले. पैसा नसल्याने आपल्या मुलावर उपचार करु शकत नाही आहोत याचं अनबुकोडी यांना प्रचंड दु:ख झालं होतं. पेरियासामी यांनी अनबुकोडी यांना समजावण्याचा प्रयत्न केला. रात्री जवळपास तीन वाजण्याच्या दरम्यान पेरियासामी यांना झोप लागली. रात्री तीन वाजून 45 मिनिटांनी जेव्हा पेरियासामी यांना जाग आली तेव्हा अनबुकोडी आणि सर्विन आपल्या जागेवर नव्हते.
पेरियासामी यांनी बायको आणि मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. खूप शोध घेतल्यानंतर आपली बायको अनबुकोडीने मुलाला घेऊन विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचं त्यांना कळलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तपास करत आहे.
डेंग्यु कशामुळे होतो? डेंग्यु हा विषाणुंमुळे होणारा आजार आहे. कोणत्याही विषाणुंमुळे होणाऱ्या साथीच्या रोगावर औषध नाही. एबोला, एच वन-एन वन स्वाइन फ्लू हे विषाणुंमुळे होणारे आजार आहेत. डास चावल्यावर शरीरात विषाणू सोडतो. हे विषाणू अतिसूक्ष्म असतात. एनएस वन चाचण्यांमध्ये हे विषाणू आढळून येतात. ही चाचणी सकारात्मक आली तर डेंग्युचे निदान करता येते.
डेंग्युची नक्की लक्षणे कोणती? ताप, घशाला सूज, खोकला, डेंग्युमध्ये कधीकधी पेशंट बेशुध्द पडतो, आकडी सुध्दा येते. पेशंटच्या मध्यवर्ती चेतासंस्थेवर परिणाम होऊ शकतो. यामध्ये पेशंटच्या यकृताचे कार्य बिघडू शकते. पेशंटच्या मुत्रसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. पेशंटच्या रक्तातील प्लेटलेट एक लाखांपेक्षा कमी झाल्याचे आढळून आले तर डेंग्युची ट्रीटमेंट सुरू करावी लागते.
नक्की काय कराल उपाय? - पाणी आणि आराम हाच डेंग्यूवर उपचार असतो.- शरीरातील पाणी कमी झाल्यानेच ग्लूकोज लावावे लागते.- योग्य उपचारांनी डेंग्यूचा रुग्ण १० ते १४ दिवसांत पूर्णत: बरा होतो.- पपयांची पाने, खजूर खाल्ल्याने डेंग्यू बरा होतो हे चुकीचे आणि गैरसमजूतीचे आहे.