वॉशिंग्टन : पाकिस्तानपासून पॅरिसच्या रस्त्यापर्यंत दहशतवाद्यांच्या बीमोडासाठी अथक प्रयत्नांचा संकल्प सोडत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांविरुद्ध नवीन युद्ध अधिकार बहाल करण्याचे आवाहन काँग्रेसला केले. त्याचबरोबर इराणच्या अणु कार्यक्रमासाठी त्याच्यावर निर्बंध लादण्याची घाई करू नये, असेही त्यांनी सुचविले. भारत दौऱ्यापूर्वी वार्षिक स्टेट आॅफ युनियन अॅड्रेसमध्ये काँग्रेसला संबोधित करताना ओबामा म्हणाले की, पाकिस्तानातील शाळेपासून पॅरिसपर्यंत जगभर दहशतवाद्यांनी ज्या लोकांना लक्ष्य केले, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. डेमोक्रॅटिक सदस्यांसह ४० संसद सदस्यांनी पॅरिस व पेशावरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या पीडितांप्रती सहवेदना व्यक्त करताना पिवळ्या पेन्सिल उंचावल्या. चार्ली हेब्डोवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पेन्सिल अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जागतिक प्रतीक बनली आहे. ओबामा म्हणाले की, मी राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर आम्ही व आमच्या मित्रांसाठी धोकादायक बनलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध अथक कारवाई केली आहे. याच काळात अमेरिकेने अफगाणिस्तान आणि इराकमधील दहशतवादविरोधी युद्धातून धडाही घेतला आहे. (वृत्तसंस्था)काय म्हणाले ओबामा...पॅरिस हल्ल्यात १७, तर पेशावरमधील हल्ल्यात १५० जण मारले गेले होते. आम्ही दहशतवादी आणि त्यांच्या जाळ्याचा बीमोड करतच राहू. आम्ही एकतर्फी कारवाईचा अधिकार सुरक्षित ठेवला आहे.
दहशतवाद्यांच्या बीमोडाचा निर्धार
By admin | Published: January 22, 2015 3:12 AM