नवी दिल्ली : यमुनेच्या विकासाची १२ हजार कोटी रुपयांची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतून प्रयागराजपर्यंत बोटीने जाता येईल. गंगा-यमुनेतून प्रवास केल्यास खर्च कमी येईल. प्रयागराजमध्ये फेब्रुवारीत प्रायोगिक तत्त्वावर बोट फेरी सुरु केली जाईल. त्यामुळे युवकांना रोजगार मिळेल,असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले. नितीन गडकरी, सत्यपाल सिंह, भाजपा प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी आणि खासदार महेश गिरी व अन्य भाजपा नेते उपस्थित होते. त्यावेळी गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ‘नमामि गंगे’चे परिणाम आता दिसून येतील.प्रयागराजमध्ये आता गंगा शुद्ध आहे. गंगा स्वच्छ करणे हा राजकीय मुद्दा नाही, तर ही नदी आमची संपत्ती आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीही गंगेच्या स्वच्छतेची योजना आखली, मात्र तिचे परिणाम दिसून आले नाहीत.’ गडकरी म्हणाले, ‘गंगेवर नव्या विद्युत प्रकल्पांना आता मंजुरी दिली जाणार नाही. हरिद्वारपासून उन्नावपर्यंत किती पाणी सोडायचे आहे, ते ठरविण्यात आले आहे. नदीमध्ये गटाराचे पाणी मिसळू नये यासाठी पाच हजार किलोमीटर लांबीची वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे.’सव्वा वर्षांमध्ये यमुना स्वच्छ होईल‘हायब्रिड एम्युटी प्रोजेक्ट’ची माहिती देताना गडकरी यांनी मथुरेत काम केले जात आहे, असे नमूद केले. यमुना नदी १३७६ किलोमीटर क्षेत्रातून जाते. ७ राज्यांमधून ती वाहते. दिल्लीत १३ योजनांच्या माध्यमातून यमुनेच्या स्वच्छतेचे काम केले जात आहे. सव्वा वर्षांमध्ये यमुना स्वच्छ होईल. हिमाचल आणि हरियाणात यमुना शुद्ध करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या नव्या मार्गामुळे यमुनापार येथील वाहतूक कोंडी संपेल,असे तिवारी यांनी नमूद केले.
१२ हजार कोटी खर्चून यमुनेचा विकास करणार- गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 5:57 AM