प्रादेशिक पक्षांमध्येच विकासाची क्षमता: असदुद्दीन ओवेसी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 01:14 AM2019-12-11T01:14:28+5:302019-12-11T01:14:54+5:30
लोकसभेचे १३५ सदस्य प्रादेशिक पक्षांचे
- नितीन नायगावकर
नवी दिल्ली : देशातील लोकांच्या गरजा समजून घेऊन त्या पूर्ण करण्याचा दृष्टिकोन फक्त प्रादेशिक पक्षांकडेच आहे. याच पक्षांमुळे राज्य मजबूत होते आणि राज्याचा जीडीपीही वाढतो. राज्यांचा जीडीपी वाढला तरच देशाचा वाढत असतो. त्यामुळे सर्वसमावेशक विकासाची क्षमता केवळ प्रादेशिक पक्षांमध्येच आहे, असे स्पष्ट प्रतिपादन एआयएमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले.
‘लोकमत संसदीय पुरस्कार’ सोहळ््याच्या निमित्ताने डॉ. आंबेडकर इंटनॅशनल सेंटरच्या भीम हॉलमध्ये ‘भारतीय राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका’ या विषयावर विचार मांडले. पत्रकार किशोर अजवानी यांनी खासदार ओवेसी यांच्याशी संवाद साधला. यावेळी ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी असदुद्दीन ओवेसी यांचे गौरवचिन्ह देऊन स्वागत केले. ‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीचे प्रकाशक राकेश शर्मा यांनी किशोर अजवानी यांचे स्वागत केले.
ओवेसी म्हणाले की, यावर्षी लोकसभा निवडणुकीत ६५ प्रादेशिक पक्षांनी १३५ मतदारसंघांमध्ये विजय मिळवला. तब्बल १४ कोटी ५ लाख मते घेऊन लोकसभेतील २३ टक्के जागांवर याच प्रादेशिक पक्षांचे सदस्य आहेत. प्रादेशिक आशा-अपेक्षा, अस्मिता, गरजा आणि समस्या समजून घेण्याची क्षमता याच पक्षांमध्ये आहे, त्यामुळे त्यांचे खासदार लोकसभेत आहेत.
प्रादेशिक पक्षांकडे असलेला विकासाचा दृष्टीकोन राष्ट्रीय पक्षांकडे नाही, त्यामुळे देशाला राष्ट्रीय पक्षांची गरज नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. काँग्रेसचा प्रभाव देशावर होता, पण विविध राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे ते निर्णय घेऊ शकत नव्हते. आज भाजपही तोच कित्ता गिरवत आहे, असे सांगून, राज्यातील शेवटच्या माणसाचा आवाज देशात पोहोचविणे केवळ प्रादेशिक पक्षांनाच शक्य आहे. राष्ट्रीय पक्षांना ते शक्य नाही, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय पक्ष होण्याचे ध्येय नाही
आयोगाच्या कायद्यानुसार राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी ६ टक्के मतांची आवश्यकता आहे. आमचा पक्ष मूळ तेलंगाणाचा आहे; पण आम्ही महाराष्ट्रात, बिहारमध्ये निवडणुका लढवल्या. आमची ही सुरुवात आहे. तरीही राष्ट्रीय पक्ष होण्याचा आमचा उद्देश नाही, असेही असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केले.