नवी दिल्ली - महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सध्या देश हादरला आहे. हैदराबाद आणि उन्नावमधील दोन्ही घटनांमुळे जनमानस खवळले आहे. आठ दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये पशुवैद्यक महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. तर, उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला गुरूवारी पेटवून देण्यात आले. या घटनेत तिचा मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण देश व्यथित झाला आहे. आरोपींना तात्काळ फाशीची, शिक्षेची मागणी देशवासियांकडून होत आहे. त्यावरुनच काँग्रेसनेदेवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय. देवेंद्र फडणवीस सरकारने निर्भया फंडमधील एकही रुपया खर्चला नसल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.
मुंबई काँग्रेसने ट्विट करुन देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनीही निर्भया फंडमधील एकही रुपया खर्च केला नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी या पैशाचा वापर करणं गरजेचं होतं. पण, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत महिलांवरील बलात्कार आणि विनयभंगाच्या प्रकरणांत दुप्पटीने वाढ झाली आहे. महाराष्ट्र हा महिलांवरील गुन्हेगारीत क्रमांक 2 चे राज्य ठरलंय, असेही काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसने एनसीआरबी संशोधनाच्या अहवालाचा दाखलाही दिली आहे. मुंबई काँग्रसने ट्विट करुन फडणवीस यांना लक्ष्य केले. त्यानंतर काँग्रेसने हे ट्विट रिट्विट केले आहे.
उन्नावप्रकरणानंतर उत्तर प्रदेशमधील वातावरण संतप्त झाले असून गेल्या वर्षभरापासून पिडीता न्याय मागत भटकत होती. मात्र, आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याची घोषणा केली. त्यानंतर, राहुल गांधींनी वायनाडमध्ये एका सभेदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. भारत हा बलात्काराची जागतिक राजधानी बनला आहे. देशातील मुली आणि बहिणींना भारत का सुरक्षा पुरवू शकत नाही, असे परदेशातून विचारले जात आहे, असे राहुल गांधींनी म्हटले होते.