नवी दिल्ली : जेएनयूमध्ये ५ जानेवारी रोजी जखमी झालेल्यांनीच हा हिंसाचार घडवून आणल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. हा हल्ला घडविणाऱ्या नऊ संशयित हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यातील सात जण एसएफआय, एआयएसए, एआयएसएफ, डीएफआय या डाव्या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते आहेत. या संशयितांत जेएनयू विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष आयशी घोष व काही माजी विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित हल्लेखोरांच्या छायाचित्रांचे पोस्टरही पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे.या संशयितांमध्ये आयशी घोष, चुनचुन कुमार, पंकज मिश्रा, सुचेता तालुकदार, प्रिया रंजन, विकास पटेल, दोलान सावन, योगेंद्र भारद्वाज आदींचा समावेश आहे. त्यापैकी योगेंद्र भारद्वाज हा युनिटी अगेन्स्ट लेफ्ट या व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन आहे. जेएनयूमध्ये हिंसाचार घडविण्यासाठी या ग्रुपचा वापर करण्यात आल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे.एसएफआय, एआयएसएफ, डीएफआयच्या कार्यकर्त्यांनी जेएनयूच्या सर्व्हरची नासधूस केली. त्यामुळे सेमिस्टरची नोंदणी बंद पडली. बहुसंख्य विद्यार्थी नोंदणीस तयार होते पण त्यांनी सहकार्य करू नये अशी भूमिका या विद्यार्थी संघटनांनी घेतली. चेहरा झाकलेल्या हल्लेखोरांनी विद्यापीठातील सर्व्हर रुम व तेथील काचेचे दरवाजे फोडले, असे पोलिसांनी सांगितले. पेरियार हॉस्टेलच्या विशिष्ट खोल्यांतील विद्यार्थ्यांना हल्लेखोरांनी लक्ष्य केले. हे बहुतांश विद्यार्थी अभाविपचे कार्यकर्ते होते. या हल्ल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. मात्र या संशयितांना चौकशीसाठी पोलीस बोलाविणार आहेत.आयशी घोषचे आव्हानमाझ्याविरोधात असलेले सर्व पुरावे पोलिसांनी सर्वांसमोर ठेवावेत अशी मागणी दिल्ली पोलिसांनी संशयित हल्लेखोर ठरविलेल्या आयशी घोष यांनी केली आहे. त्या जेएनयू विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष आहेत. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे घाबरण्याचा प्रश्नच नाही. दिल्ली पोलीस पक्षपातीपणे वागत आहेत, सनदशीर मार्गाने आमचा लढा सुरूच राहिल असेही त्यांनी सांगितले.फीवाढ होणारच : कुलगुरूफीवाढीसंदर्भात घेतलेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी भूमिका कुलगुरू एम. जगदीशकुमार यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर शुक्रवारी झालेल्या त्बैठकीत घेतली. फीवाढ रद्द करण्यासाठी विद्यार्थी आणत असलेल्या दबावापुढे न झुकण्याचा पवित्रा कुलगुरुंनी घेतला आहे. विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे व शैक्षणिक सत्र सुरू करण्यास सहकार्य करावे असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.पुरावे जपून ठेवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिकाजेएनयूमध्ये गुंडांनी विद्यार्थी, शिक्षकांना केलेल्या बेदम मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुरावे नीट जपून ठेवण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने द्यावेत अशी विनंती करणारी याचिका शुक्रवारी या विद्यापीठातील तीन प्राध्यापकांनी केली आहे. व्हॉट्सअॅपवरील मेसेज, युनिटी अगेन्स्ट लेफ्ट, फ्रेंड्स आॅफ आरएसएस या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील चर्चेची माहिती, मारहाणीची छायाचित्रे, व्हिडीओ क्लिप, या ग्रुपच्या सदस्यांचे फोन क्रमांक ही माहिती पुरावा म्हणून जपून ठेवावी असा आदेश सरकारला द्यावा असे या याचिकेत म्हटले आहे. ही याचिका जेएनयूमधील अमित परमेश्वरन, अतुल सूद, शुक्ला विनायक सावंत या प्राध्यापकांनी केली आहे.>मनुष्यबळ विकासमंत्र्यांवर पक्षश्रेष्ठी नाराजजवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयु) सध्याची परिस्थिती लवकरात लवकर निवळावी, अशी मोदी सरकारची इच्छा आहे. संबंधित अधिकाºयांनी परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली त्यातून ती आणखीनच बिघडली व पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी खूपच नाराज झाले. त्यांच्या नाराजीनंतरच मनुष्यबळ विकास मंत्रालय सक्रिय झाले व त्याने विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना बोलावून ते कुठे कसे कसे चुकले याची चांगली समज त्यांना दिली. भाजपने अभाविपला डाव्यांच्या निदर्शनांना निदर्शनांनी प्रतिउत्तर देऊ नका, असे सांगितले आहे. नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याविरोधातील (सीएए) प्रकाशझोत जेएनयुतील घटनांवर गेल्याबद्दल पक्षाचे नेतृत्व नाराज आहे. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल-निशंक यांनी ज्या पद्धतीने जेएनयूतील घटना हाताळल्या तेही कारण पक्ष श्रेष्ठींच्या नाराजीचे आहे. त्यानंतर जगदीश कुमार व निशंक यांच्यात काही बैठका झाल्या.
जखमी झालेल्यांनीच हिंसाचार घडविला?, विद्यार्थी नेत्या आयशी घोषचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 5:46 AM