नवी दिल्ली - मध्ये प्रदेशातील काँग्रेसचे सरकार सुरक्षीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द कमलनाथ यांनीच या संदर्भात दावा केला आहे. येथे रंगलेले राजकीय नाट्य तब्बल 22 तासांनंतर संपुष्टात आले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह संकटमोचक म्हणून समोर आले. मात्र त्यांच्या या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
दिग्विजय सिंह यांच्या भूमिकेवर काँग्रेसमधूनच प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. किंबहुना या सर्व राजकीय नाट्याचे सूत्रधार दिग्विजय सिंह हेच होते, असा आरोप एका काँग्रेस नेत्याने अप्रत्यक्षरित्या केला आहे.
दिग्विजय सिंह यांनी राज्यसभेत जाण्यासाठी हे सर्व केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे, बंडखोरीच्या तयारीत असलेल्या सहा आमदारांपैकी दोन आमदार दिग्विजय सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. यामध्ये बिसाहूलाल सिंह आणि एंदल सिंह कंशाना या दोन आमदारांचा समावेश आहे.
कमलनाथ सरकारमधील मंत्री उमंग सिंघार यांनीच ट्विट करून दिग्विजय सिंह यांच्यावर नाव न घेता आरोप केला आहे. मध्य प्रदेशातील राजकीय नाट्याला दिग्विजय सिंह हेच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, कमलनाथ यांचं सरकार सुरक्षीत आहे. ही केवळ राज्यसभेत जाण्यासाठीची लढाई आहे. बाकी सर्व सुज्ञ आहेत, अस सिंघार म्हणाले.
दिग्विजय सिंह यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला आहे. मध्य प्रदेशातून राज्यसभेवर तीन सदस्य निवडण्यात येणार आहे. यापैकी दोन जागांवर काँग्रेसचा विजय निश्चित आहे. दोनपैकी एका जागेवर दिग्विजय सिंह यांना राज्यसभेवर जायचं आहे. कमलनाथ सरकार वाचवण्याच्या अटीवर काँग्रेस नेतृत्व दिग्विजय सिंह यांची राज्यसभेवर वर्णी लावणार असल्याचे समजते.