नवी दिल्ली - अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराचे भूमिपूजन 3 किंवा 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याचा निर्णय रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने घेतला. तसे निमंत्रण न्यासाने पंतप्रधानांना पाठविले आहे. कोणत्या दिवशी भूमिपूजन करायचे याचा अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालय घेईल. कोरोना वा लॉकडाऊनचे अडथळे न आल्यास भूमिपूजनानंतर साडेतीन वर्षांत मंदिराचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. राम मंदिराच्या मुद्यावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना नाव घेता टोला लगावला होता.
आम्हाला वाटते की कोरोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटते की मंदिर बांधून कोरोना जाईल, असा टोला अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी मोदी सरकारला सोलापूर येथील दौऱ्यादरम्यान लगावला. पवारांच्या या विधानाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पाठिंबा दिला आहे. दिग्विजय सिंह यांनी याबाबतचं एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सोमवारी (20 जुलै) दिग्विजय यांनी शरद पवारांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.
"पवार साहेब, तुम्ही योग्य बोललात. मी याच्याशी सहमत आहे. जर कदाचित मोदी-शाह हे तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते तर देशाची ही अवस्था झाली नसती" असं ट्विट दिग्विजय सिंह यांनी केलं आहे. शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमीपूजनावरून पंतप्रधान मोदींना टोला लगावला होता. काही लोकांनी वाटतेय की राम मंदिरामुळे कोरोना बरा होईल. कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे हे त्यांनी ठरवायला हवे. सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवे असं पवार यांनी म्हटलं होतं.
कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांनी बाहेर काढायला हवे. कदाचित राम मंदिरामुळे कोरोना जाईल असे त्यांना वाटत असावे. कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने देशाची अर्थव्यवस्था खचली आहे. त्यावर मोदींनी लक्ष द्यावे, असे मला वाटत असल्याचे पवार म्हणाले होते. आपले खासदार याबाबत जिथे गरजेचे आहे तिथे सरकारचे लक्ष वेधतील असे पवार यांनी सांगितले होते. त्यानंतर आता दिग्विजय यांनी पवारांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना रुग्णालयात डुक्करांचा मुक्त संचार; Video जोरदार व्हायरल
Assam Floods : आसामला पुराचा तडाखा, तब्बल 110 जणांचा मृत्यू
CoronaVirus News : इथे ओशाळली माणुसकी! ...अन् रुग्णालयाबाहेर भर पावसात कित्येक तास पडून होती महिला