नवी दिल्ली - मध्यप्रदेशातील राजकीय घडामोडींना आता आणखी वेग आला आहे. संकटात आलेल्या कमलनाथ सरकारला वाचविण्यासाठी ज्येष्ठ काँग्रेसनेतेदिग्विजय सिंह मैदानात उतरले आहेत. यावरून भाजपनेते कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करून दिग्विजय सिंह यांना टोला लगावला आहे.
काँग्रेसच्या बंडखोऱ आमदारांना भेटण्यासाठी गेलेल्या दिग्विजय सिंह यांनी बंगळुरू येथे आंदोलन सुरू केले आहे. त्यावर विजयवर्गीय म्हणाले की, बंगळुरू येथे पुन्हा नाटकबाजी सुरू झाली आहे. आमचं नशीबच म्हणावं लागल की, दिग्विजय सिंह राजकारणात आहेत. बॉलिवूडमध्ये असते तर त्यांनी अमिताभ बच्चन यांनाही मात दिली असती.
माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह सध्या काँग्रेसच्या नेत्यांसह बंगळुरू येथे दाखल झाले आहेत. त्यांनी यावेळी काँग्रेसच्या बंडखोऱ 22 आमदारांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना भेटीसाठी नकार देण्यात आला. त्यानंतर त्यांनी तिथेच आंदोलन सुरू केले. त्यामुळे त्यांना सुरक्षेच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आले आहे.
काँग्रेसचे बंडखोऱ 22 आमदार सध्या बंगळुरूत आहेत. या सर्व आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यापैकी 6 आमदारांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. अशा स्थितीत भाजपने दावा केला की, काँग्रेस सरकार अल्पमतात आहेत. त्यामुळे भाजपने फ्लोरटेस्टची मागणी केली आहे. तर काँग्रेसने आरोप केला की, बंडखोर आमदारांना भाजपकडून बंदी बनवण्यात आले आहे.