नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पुलवामा येथे भारतीय सैन्यावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. 14 फेब्रुवारी रोजी या घटनेला एक वर्ष पूर्ण होणार आहे.
एक वर्ष उलटूनही पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नसल्याकडे दिग्विजय सिंह यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, पुलवामा हल्ल्याला आता एक वर्ष उलटत आले आहे. शहिदांच्या पत्नी मदतीसाठी सरकारला याचना करत आहे. आता तरी सरकारने त्यांचे ऐकायला हवं, असं दिग्विजय सिंह म्हणाले.
दरम्यान मोदी-शाह यांचे देशात नाव झाले आहे. राष्ट्रवादाच्या नावावर लोकसभा निवडणूकही जिंकली आहे. आता शहिदांची आठवण कशाला येईल असा सवाल करत 2024 मध्ये बघू अशी भूमिका भाजपची असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
यावेळी दिग्विजय सिंह यांनी मोदी भक्तांवर देखील निशाना साधला. या लोकांचे हिंदुत्व इतर धर्मियांविरोधात भावना भडकवून मतांचा राजकारण करणे हेच आहे. त्यामुळे पुलवामामधील शहीद जवानांच्या कुटुंबीयांविषयी देखील हे विचार करत नसल्याचं दिग्विजय सिंह म्हणाले.