भोपाळ : ‘मी हिंदू दहशतवाद असा शब्द नव्हे तर संघ दहशतवाद असा शब्द वापरत आलो आहे. कोणताही धर्म दहशतवादाला पाठिंबा देत नसल्याने अशा कारवायांचा धर्माशी संबंध जोडता येणार नाही' असे उद्गार काढून काँग्रेसचे सरचिटणीस व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी आपल्या पक्षालाच अडचणीत टाकले आहे. त्यांच्या या विधानांचा भाजप व संघालाच जास्त फायदा होण्याची शक्यता असल्याची भीती काँग्रेसच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.काँग्रेसच्या समन्वय समितीच्या प्रमुखपदी दिग्विजयसिंह यांची अलीकडेच नियुक्ती करण्यात आली. तळागाळातील माणसाला पक्षाशी पुन्हा जोडण्यासाठी त्यांनी राज्यामध्ये एकता यात्रेला प्रारंभ केला. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुका पाच महिन्यांवर येऊन ठेपल्या असून त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे पक्षात अस्वस्थता आहे. ‘मालेगाव, समझोता एक्स्प्रेस, मक्का मशिद येथे संघविचारांनी प्रेरित झालेल्यांनी बॉम्बस्फोट घडविले होते. रा स्व. संघ विद्वेष, हिंसाचार पसरवतो, दहशतवादाचे समर्थन करतो' असे ते शनिवारी म्हणाले होते. (वृत्तसंस्था)
दिग्विजयसिंहांच्या विधानांनी काँग्रेस अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 4:33 AM