महाराष्ट्रासह १४ राज्यांना ‘कोव्हॅक्सिन’चा थेट पुरवठा; भारत बायोटेकच्या संचालिकांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:06 AM2021-05-11T06:06:07+5:302021-05-11T06:10:10+5:30
कंपनीने आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम, छत्तीसगड, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना आतापर्यंत ‘कोव्हॅक्सिन’चा पुरवठा करण्यात आला आहे.
हैदराबाद : महाराष्ट्र आणि दिल्लीसह १४ राज्यांना ‘कोव्हॅक्सिन’ या कोरोनावरील लसीचा थेट पुरवठा करणे सुरू केले आहे, अशी माहिती भारत बायोटेकच्या सहव्यवस्थापकीय संचालिका सुचित्रा एल्ला यांनी दिली.
एल्ला यांनी याबाबत ट्विट सांगितले की, केंद्र सरकारच्या वाटपानुसार लसीचा पुरवठा करण्यात येत आहे. कंपनीने १ मेपासून पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम, छत्तीसगड, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना आतापर्यंत ‘कोव्हॅक्सिन’चा पुरवठा करण्यात आला आहे. ही लस ‘आयसीएमआर’च्या सहकार्यातून भारत बायोटेकने विकसित केली आहे. ही संपूर्णपणे स्वदेशी लस असून राज्य सरकारसाठी या लसीची किंमत ४०० रुपये प्रति मात्रा ठेवण्यात आली आहे. ही लस विविध टप्प्यांमधील चाचण्यांमध्ये ८१ टक्के प्रभावी ठरली आहे. केंद्र सरकारने १ मेपासून सुरू केलेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकारांना लसीची स्वतंत्र खरेदीची परवानगी दिली आहे. तसेच खासगी रुग्णालये आणि काॅर्पोरेट कंपन्यांनाही मुभा दिली आहे.
दिवसरात्र एक करून लस पुरवणार
- तिसऱ्या टप्प्यासाठी अनेक राज्यांकडून कंपनीकडे मागणी नोंदविण्यात आली आहे.
- लसीच्या उपलब्धतेनुसार दिवस-रात्र एक करून राज्यांना साठा पोहोचविण्यात येईल, असे आश्वासन एल्ला यांनी दिले आहे.