केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांमुळे दिव्यांग मुलांना तब्बल 3 तास ठेवलं उपाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 01:12 PM2018-02-01T13:12:28+5:302018-02-01T13:16:39+5:30
तब्बल तीन तास उपाशी पोटी राहून दिव्यांग मुलांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची वाट पाहावी लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
नवी दिल्ली - तब्बल तीन तास उपाशी पोटी राहून दिव्यांग मुलांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची वाट पाहावी लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. जोपर्यंत राजनाथ सिंह यांचा कार्यक्रम आटोपत नाही तोपर्यंत या दिव्यांगांना दुपारचे जेवण देण्यात आले नाही. एवढंच नाही तर जेथे जेवण-पाण्याची सोय करण्यात आली होत्या, त्या खोलीतही या मुलांना जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. व्हिलचेअर मिळण्याच्या आशेपोटी आपल्या दिव्यांग मुलांना कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पालकांना या प्रकारामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. भूकेनं व्याकुळ झालेली मुलं येथे रडू लागली. चंदिगडमधील इंडियन रेस क्रॉस सोसायटी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दिव्यांग मुलांना व्हिलचेअर वितरित करण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर येथे बोलावण्यात आले होते. याठिकाणी एक धर्मशाळेचंही लोकार्पण करण्यात येणार होते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमासाठी त्यांना सकाळी 11 वाजता पोहोचायचे होते, मात्र ते 11.35 वाजण्याच्या सुमारास पोहोचले. राजनाथ सिंह पोहोचल्यानंतरही मुलांच्या जेवणाची समस्या कायमच होती. कार्यक्रम ठिकाणी दाखल झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी वृक्षारोपण केले. यादरम्यान त्यांनी व्हीआयपी लोकांची भेट घेतली. यानंतर दिव्यांगांना व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले.
आयोजकांनी मुलांना तीन तास उपाशी ठेवण्याचं कारण धक्कादायक व तितकेच संतापजनक असेच होते. केवळ दिव्यांग मुल व राजनाथ सिंह यांच्या फोटोसाठी मुलांना जेवणापासून थांबवण्यात आल्याचं आयोजकानं सांगितलं. सकाळी 9 वाजल्यापासून कार्यक्रमासाठी बोलावण्यात आल्याचे दिव्यांग मुलांच्या पालकांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पत्रकारांना सांगितले. रिकाम्या पोटी पोहोचलेल्या मुलांसाठी काही वेळानंतर खाण्यापिण्याची सोय करण्यात येईल, असे त्यांच्या पालकांना वाटलं. मात्र राजनाथ सिंह येईपर्यंत त्यांना तब्बल तीन तास वाट पाहावी लागल्याचंही सांगत पालकांनी नाराजी व्यक्त केली.
जेव्हा पत्रकारांनी दोन वर्षांच्या मान्याच्या रडण्यामागील कारण आई अनीताला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितले की, आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून मंत्र्यांची प्रतीक्षा करत आहेत, आता 11 वाजत आले आहेत, भूकेनं व्याकुळ होऊन माझी मुलगी रडत आहे.
तर चार वर्षांचा दिव्यांग मुलगा लकीला सांभाळण्यात त्याचे वडील महेश शर्मा यांनी बराच त्रास सहन करावा लागल्याचं पाहायला मिळालं. माझा मुलगा बेडवरही नीट झोपू शकत नाही, त्याला येथे तात्कळत बसून राहिल्यानं प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, असंही महेश शर्मा यांनी सांगितले. संतापजनक बाब म्हणजे चंदिगड नगरपालिकेकडून कार्यक्रमाच्या ठिकाणी बाहेरील बाजूस मोबाइल टॉयलेट ठेवण्यात आले होते, मात्र जसा गृहमंत्र्यांचा कार्यक्रम उरकला तसंच मोबाइल टॉयलेट तेथून हटवण्यात आला.