जम्मू-काश्मिरात नव्या राज्यपालांचा शोध, दिनेश्वर शर्मा यांच्या नावाची चर्चा जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 04:03 AM2018-06-20T04:03:10+5:302018-06-20T04:03:10+5:30
जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारची युती संपुष्टात आल्यानंतर आता मोदी सरकारने नव्या राज्यपालांच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारची युती संपुष्टात आल्यानंतर आता मोदी सरकारने नव्या राज्यपालांच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे. राज्यपाल एन.एन. व्होरा यांचा १0 वर्षांचा कार्यकाळ २४ जून २०१८ रोजी संपत आहे. त्यांची २५ जून २००८ रोजी पाच वर्षांसाठी नियुक्ती झाली होती. नंतर, १३ एप्रिल २०१३ रोजी त्यांची पुन्हा या पदावर नेमणूक करण्यात आली. आता राज्यपालपदासाठी दिनेश्वर शर्मा यांच्या नावाची चर्चा आहे. यासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे.
शर्मा हे गुप्तचर विभागाचे प्रमुख होते व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे ते निकटवर्तीय आहेत. काश्मिरातील विविध गटांशी संवादासाठी यापूर्वी दिनेश्वर शर्मा यांची सरकारने मध्यस्थ म्हणून नियुक्ती झाली होती. या नेमणुकीमागेही डोवालच होते. विशेष म्हणजे, जम्मू- काश्मीरमधील राज्यपालपदाच्या नियुक्तीपूर्वी व्होरा हेसुद्धा काश्मिरात सरकारकडून संवाद साधणारे मध्यस्थ होते.
>अनुभवी नेता हवा
साऊथ ब्लॉकमध्ये
विचार सुरू आहे की, जम्मू - काश्मीरसारख्या गुंतागुंतीच्या राज्यात राज्यपालांची निवड करताना अनुभवी राजकीय नेत्याची आवश्यकता आहे.
राजकीय अस्थिरतेच्या काळात राज्यपालांची
निवड करताना कोणतीही घाई होऊ नये, असाही विचार केला जात आहे. राज्यातील परिस्थिती रुळावर आल्यानंतर नव्या राज्यपालांची निवड केली जावी, असाही एक मतप्रवाह आहे.
मोदी सरकारला राज्यात नव्याने निवडणुका नको आहेत. त्यामुळे तूर्तास सरकारकडून सावध पावले टाकली जातील.