चर्चा, वादविवाद हा लोकशाहीचा आत्मा
By admin | Published: November 27, 2015 12:36 AM2015-11-27T00:36:09+5:302015-11-27T00:36:09+5:30
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारी प्रारंभ होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुद्यांवर चर्चेची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारी प्रारंभ होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुद्यांवर चर्चेची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. चर्चा, वादविवाद हा संसदेचा आत्मा आहे. चर्चेसाठी संसदेखेरीज दुसरे अन्य मोठे व्यासपीठ असूच शकत नाही, असे सांगतानाच त्यांनी या अधिवेशनात चांगले विचार, चांगली चर्चा आणि नव्या कल्पना समोर येतील असा विश्वास व्यक्त केला.
संसदेत चर्चा, वादविवादासह अन्य बाबीही असतात. देशाचे ते कार्यक्षेत्र ठरते, असे त्यांनी महिनाभर चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले. संसदेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी बुधवारी सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाली आहे. चर्चेसाठी सर्व पक्षांनी सकारात्मकता दाखविल्यामुळे मी आनंदी आहे. संसदेकडून देशाची अपेक्षा असून जनतेच्या कसोटीला उतरण्यासाठी खासदार कोणतीही कसर सोडणार नाहीत, अशी मला आशा आहे. विरोधकांना असहिष्णुतेच्या मुद्यावर चर्चा हवी आहे. आमची सर्व मुद्यांवर चर्चेची तयारी आहे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारतीय संविधानाबद्दल देशभरात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. विद्यार्र्थ्यांनी भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना वाचायला हवी. हळूहळू संविधान हे जनतेच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे मोदी म्हणाले. घटनेचा मसुदा लिहिण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्षही साजरे होण्याचा योगायोग साधला जाणे प्रेरणादायी आणि सुदैवाची बाब आहे.
>> डॉ. आंबेडकरांना अभिवादन
नवी दिल्ली : देशाच्या राज्यघटनेने दिलेल्या संकल्पना आणि मूल्ये जपत घटनाकारांना अभिमान वाटेल अशा भारताची निर्मिती करू या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवरून देशवासीयांना दिले. देशात पहिला घटनादिन साजरा होण्याच्या ऐतिहासिक प्रसंगामुळे आपल्याला राज्यघटनेबद्दल खूप काही जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल. देशाला घटना देण्यासाठी ज्यांनी अथकपणे कार्य केले त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य योगदानाचे स्मरण केल्याखेरीज आपल्या राज्यघटनेचा उल्लेख पूर्णत्वास जाणार नाही. मी त्यांना अभिवादन करतो, असेही मोदींनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)