नवी दिल्ली : राज्यसभेत जीएसटीसंबंधी घटनादुरुस्ती विधेयकावर बुधवारीही चर्चा होऊ शकली नाही. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जीएसटी विधेयकाला विरोध करीत चर्चा होणार नाही, असे ठामपणे सांगितले. तत्पूर्वी ललित मोदी व व्यापमं घोटाळ्याच्या मुद्यावरून विरोधकांनी गदारोळ घालत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनाची मागणी केली. संसदेचे कामकाज चालू द्यावे असा सल्ला काही बिझिनेस हाऊसकडून देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करीत काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला.दोनदा कामकाज तहकूब करण्यात आल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी माल आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक चर्चेसाठी सादर केले. उपसभापती पी. जे. कुरियन यांनी हे विधेयक मंगळवारीच सभागृहात सादर करण्यात आल्याचे सांगत ही चर्चेची वेळ असल्याचे स्पष्ट केले. दोनदा कामकाज थांबवूनही गदारोळ सुरूच राहिल्याने अखेर त्यांनी दिवसभरासाठी सभागृह तहकूब केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘जीएसटी’वरील चर्चा पुन्हा रोखली
By admin | Published: August 13, 2015 2:04 AM