गरिबांचे कल्याण करा; माझ्या आईची शिकवण, शंभरीत पदार्पण करणाऱ्या आईसाठी पंतप्रधानांनी लिहिला भावनिक ब्लॉग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 07:52 AM2022-06-19T07:52:31+5:302022-06-19T07:53:22+5:30
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबा यांनी वयाच्या शंभरीमध्ये पदार्पण केले. त्यानिमित्ताने मोदी यांनी ब्लॉग लिहिला. त्यात आईचे बलिदान व आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबा यांनी वयाच्या शंभरीमध्ये पदार्पण केले. त्यानिमित्ताने मोदी यांनी ब्लॉग लिहिला. त्यात आईचे बलिदान व आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला आहे. मोदी यांचा आत्मविश्वास बळावला आणि व्यक्तिमत्वाला आकार आला, अशा घटनांचा उल्लेख त्यात केला आहे.
पंतप्रधानांनी शनिवारी गुजरातमध्ये आई हिराबा यांची भेट घेत त्यांचा आशीर्वाद घेतला. मोदी लिहितात की, गरिबांच्या कल्याणासाठी मजबूत संकल्प करणे आणि त्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आईने नेहमीच प्रेरित केले. त्यांनी हा ब्लॉग हिंदी, इंग्रजीशिवाय अन्य प्रादेशिक भाषांत उपलब्ध केला आहे.
कधी कुणाकडून लाच घेऊ नका
आपल्या भावनिक ब्लॉगमध्ये नरेंद्र मोदी लिहितात की, भाजपाचे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपली २००१ मध्ये निवड करण्यात आली तेव्हा आईला खूप आनंद झाला होता. तेव्हा आई म्हणाली होती, सरकारमधील तुमचे काम तर मला समजत नाही पण, मला एवढेच सांगायचे आहे की, तुम्ही कधीच कुणाकडूनही लाच घेऊ नका. नरेंद्र मोदी म्हणतात की, वडिलांचा एक जवळचा मित्र बाजूच्या गावात राहायचा. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर वडिलांनी या मित्राचा मुलगा अब्बासला आमच्या घरी आणले. आमच्यासोबत राहून त्याने शिक्षण पूर्ण केले. ईदला आई अब्बाससाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवित असे.