लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सातत्याने वाढत चाललेली कोरोनाबाधितांची संख्या, रुग्णालयांमध्ये कमी पडत असलेली खाटांची संख्या, प्राणवायूची भासत असललेली तीव्र टंचाई, औषधांचा तुटवडा, लसींचा अपुरा पुरवठा अशी देशभरात गोंधळाची स्थिती असताना या सगळ्यासाठी तुमच्याकडे काय आराखडा तयार आहे, अशी विचारणा करत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघाडणी केली. आज, शुक्रवारी या मुद्द्यावर पुन्हा सुनावणी होणार आहे.
देशभरात गेल्या २४ तासांत तब्बल तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. तसेच २१०० हून अधिक बाधितांचे बळी गेले. कोरोनाशी संबंधित सर्वच बाबतीत देशात सध्या सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडे कोणता आराखडा तयार आहे, अशी विचारणा सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केली. आरोग्य यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या याचिका सध्या देशातील सहा उच्च न्यायालयांमध्ये दाखल आहेत. त्यांची एकत्रित दखल घेणे आम्ही इष्ट समजतो, असे स्पष्ट करत सरन्यायाधीशांनी प्राणवायूचा पुरवठा, गरजेच्या औषधांचा पुरवठा, लसीकरणाची पद्धत आणि प्रक्रिया यासंदर्भात केंद्राकडे काय आराखडा तयार आहे, याची विचारणा केली.
आणीबाणीसदृश स्थिती प्राणवायूच्या पुरवठ्यासंदर्भातील अन्य एका याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी देशातील सद्य:स्थिती राष्ट्रीय आणीबाणीसदृश असल्याचे मत व्यक्त केले.
दिल्ली उच्च न्यायालयाचे ताशेरेदिल्लीतील रुग्णालयांमध्ये प्राणवायूची तीव्र टंचाई भासत असून यासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारी अनास्थेवर ताशेरे ओढले. तुम्ही भीक मागा, विकत आणा किंवा चोरी करा, परंतु रुग्णशय्येवर असलेल्या ्रप्रत्येक गरजूला पुरेशा प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा झालाच पाहिजे, असे स्पष्ट करत लोकांना तुम्ही असे प्राणवायूअभावी मरू देऊ शकत नाहीत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला