नवी दिल्ली – संपूर्ण जगभरात कोरोनानं विळखा घातला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. आतापर्यंत ५९ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासांत तब्बत ८५ हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले, ९० हजारांहून जास्त कोरोनामुळे मृत्यू गेले आहेत. कोरोना व्हायरस रोखणं हे भारतासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे.
देशासमोरील या आव्हानावर भाष्य करताना सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी शनिवारी केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, कोरोनावरील लस खरेदी आणि वितरणासाठी पुढील वर्षी जवळपास ८० हजार कोटी खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे भारत सरकार पुढच्या वर्षी ८० हजार कोटी उपलब्ध करणार का? असं त्यांनी विचारलं आहे.
तसेच भारतात कोणत्याही प्रकारची लस आणि वितरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगीची गरज असते. त्यामुळे पुढच्या वर्षी आपल्याला या आव्हानाला सामोरे जावं लागणार आहे. मी हा प्रश्न विचारला कारण आपल्याला त्यासाठी प्लॅनिंग आणि उपाययोजना कराव्या लागणार आहेत असं अदार पूनावाला म्हणाले.
पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. ती कोरोना व्हायरससाठी वेगवेगळ्या लसींवर काम करत आहेत. त्याच्या विविध संभाव्य लसींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी असलेल्या अॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लसीचा समावेश आहे, जी सध्या जगात सर्वात चर्चेत आहे. त्याचबरोबर इंस्टीट्यूट स्वतःची लसही विकसित करीत आहे.
२०२४ च्या अखेरपर्यंत जगभरातील लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणात लस तयार होऊ शकणार नाही.
मागील आठवड्यात फायनेंशियल टाइम्समध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार अदार पूनावाला यांनी सांगितले होते की, ''औषध निर्मीती करत असलेल्या कंपन्या कमी कालावधीत संपूर्ण जगभराला लस पुरवू शकत नाहीत. त्या प्रमाणात उत्पादन क्षमता विकसित झालेली नाही. पृथ्वीवरील सर्व लोकांना लस पुरवण्यासाठी ४ ते ५ वर्षांचा कालावधी लागू शकतो. तसंच एका व्यक्तीसाठी जर लसीचे २ डोस लागत असतील संपूर्ण जगभरासाठी १५ अब्ज डोजची गरज भासू शकेल.''
अदार पूनावाला यांनी भारतातील १.४ अब्ज लोकांपर्यंत लस पुरवण्यासाठी चिंता व्यक्त केली होती. कारण लसीच्या वाहतुकीसाठी आणि वितरणासाठी कोल्ड चेन सिस्टिम सध्या उपलब्ध नाही. लस तयार केल्यानंतर कमी तापमानाच्या ठिकाणी किंवा फ्रिजमध्ये ठेवावी लागते. एका जागेवरून इतर ठिकाणी नेण्यासाठी कोल्ड सिस्टिम असणं गरजेचं असतं. मागच्या आठवड्यात कोल्ड चेन सिस्टिमबाबत अमेरिकेतील प्रसिद्ध कोरोना तज्ज्ञ डॉ. फाऊची यांनीही चिंता व्यक्त केली होती.