नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एन्ट्रान्स एक्झाम पुढे ढकलण्याची मागणी जोर धरत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे लोकसभेतील गटनेता अधीर रंजन चौधरी यांनी या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली होती. त्यानंतर, भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीचा सरकारला घरचा अहेर दिला आहे. सद्यपरिस्थितीच JEE आणि NEET परीक्षा घेणे उचित नसल्याचे स्वामींना सूचवले आहे.
इंजिनीअरिंग व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची जेईई व नीट या परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. जेईई मुख्य परीक्षा १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबरमध्ये होतील आणि परीक्षांचे निकाल सप्टेंबरच्या अखेरीस लागणार आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (एमबीबीएस, बीडीएस) नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार असून, तिचा निकाल ऑक्टोबर महिन्यात लागेल. मात्र, देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, या परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेस नेते व खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केली होती. त्यानंतर, ममता बॅनर्जी यांनीही हीच मागणी लावून धरली. आता, सुब्रमण्यम स्वामी यांनीही या मुद्द्यावरुन सराकरला लक्ष्य केले आहे.
ममता बॅनर्जींची मागणी
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा नको, असे म्हणत सुरक्षित आणि निर्भय वातावरणात परीक्षा पार पडाव्या, असेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसेच, सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणाऱ्या NEET आणि जेईई परीक्षाही पुढे ढकलाव्यात अशी मागणीही बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.
काँग्रेसचीही तीच मागणी
दरम्यान, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विनंती केली आहे. सप्टेंबर महिन्यात नियोजित वेळापत्रकानुसार होणाऱ्या जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकल्यात याव्यात अशी मागणी चौधरी यांनी या पत्राद्वारे केली आहे. देशातील कोरोनाबाधितांची वाढती लोकसंख्या आणि कोरोना महामारीचं संकट लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करण्यात यावा. या महामारीच्या संकटात केवळ शारीरिकदृष्ट्याच नाही, तर मानसिकदृष्ट्याही तयार नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, या परीक्षा पुढे ढकल्यात याव्यात, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलंय.