नवी दिल्ली, दि. 9 - गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात 27 ऑगस्टच्या संध्याकाळी चीनमधील भारतीय राजदूत विजय गोखले यांना सांगितलं जातं की, तुमची लवकरात लवकर भेट कशी होईल यासाठी चीन उत्सुक आहे. विजय गोखले यांच्याकडून कळवलं जातं की, मी सध्या हाँगकाँगमध्ये आहे, आणि जर बीजिंगला येणारी पहिली फ्लाईट पकडली तर मध्यरात्री पोहोचू शकेन. यानंतर जेवढ्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर बीजिंगला पोहोचण्यास त्यांना सांगण्यात येतं. डोकलामचा वाद संपवण्यासाठी चीनकडून उचलण्यात आलेलं हे पहिलं पाऊल असून, हा त्यांच्याकडून मिळालेला स्पष्ट संकेत होता.
रात्रीचे दोन वाजले असताना डोकलाम वादावर चर्चा करण्यासाठी विजय गोखले आणि चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांची बैठक सुरु होते. तोडगा निघावा यासाठी सुरु असलेली भारत आणि चीनमधील ही बैठक जवळपास तीन तास सुरु होती. या तीन तासांच्या चर्चेनंतर सकारात्मक विचार करत शेजारी राष्ट्रांमधील नव्या नात्याला सुरुवात झाली.
दुस-या दिवशी दोन्ही देशांनी डोकलाम वादावर माघार घेत असल्याचं जाहीर केल्यानंतर इतके दिवस सुरु असलेला वाद अखेर संपला. यामुळे द्विपक्षीय संबंध मजबूत असून, संघर्ष टाळून विकासासाठी आपण कटिबद्द असल्याचं दोन्ही देशांनी दाखवून दिलं. सरकारशी संबधित एका वरिष्ठ अधिका-याने सांगितलं की, 'तणाव संपवण्यामध्ये दोन्ही देशाचे प्रमुख नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग यांची सक्रीय भूमिका होती. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधाचा वापर एकमकेांच्या फायद्यासाठी तसंच विकासाला चालना देण्यासाठी करावा यावर सहमीत दर्शवली'.
या संपुर्ण प्रकरणाशी संबंधित एका सरकारी अधिका-याने सांगितलं की, 'दोन्ही देशांकडे अनेक संधी उपलब्ध आहेत, ज्यामुळे जलदगतीने विकासाच्या दिशेने वाटचाल करु शकतो यावर दोन्ही नेत्यांचं एमकत झालं होतं. एकाचं नुकसान, दुस-याचा फायदा असा विचार करणं मुर्खपणाचं ठरलं असतं असंही त्यांचं म्हणणं होतं. याचाच फायदा वाद मिटवण्यासाठी आणि ब्रिक्स परिषदेत सकारात्मक चर्चा होण्यासाठी झाला'.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तणाव वाढल्याने दोन्ही देशांना कोणताच फायदा होणार नाही असं सांगितलं होतं. ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये जवळपास 73 दिवसांपासून सुरु असलेला वाद अखेल संपला. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बळाचा वापर करत परिस्थिती बदलली जाऊ शकत नाही या मताचे होते, तिथेच या वादामुळे युद्धपरिस्थिती निर्माण होऊ नये असंही त्यांनी वाटत होतं. अशा परिस्थितीत परराष्ट्र मंत्रालयाला अत्यंत शांतपणाने प्रकरण हाताळण्याचा आदेश त्यांनी दिला. पक्षालाही संयम बाळगण्याचा आदेश देण्यात आला होता. पक्षाशिवाय आरएसएसशी संबंधित संघटनाही डोकलाम वादावर शांत राहिल्या. चीनकडून वारंवार भडकाऊ वक्तव्य होत असताना आपल्याकडून मात्र प्रत्युत्तर दिलं जात नव्हतं. त्यामुळे शाब्दिक चकमक टळली.
मोदींनी चीनसोबत सुरु असलेल्या वादाचा परिणाम व्यवसायावर होऊ दिला नाही. वाद सुरु असतानाही अनेक नेत्यांनी बीजिंगचा दौरा करत, सहकार्य करण्यावर लक्ष देण्याचं आवाहन केलं. यामुळे क्षी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मोदींना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.