'कोरोना लसीच्या उत्साहात चीनची घुसखोरी अन् अर्थव्यवस्था विसरु नका'
By महेश गलांडे | Published: January 5, 2021 02:49 PM2021-01-05T14:49:06+5:302021-01-05T14:49:49+5:30
सरकारने कोरोना लसीच्या उत्साहात चीनने भारतीय सीमाहद्दीत केलेल्या 4 हजार स्वेअर किमीचा कब्जा केलाय, ते विसरता कामा नये. तसेच, देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे.
नवी दिल्ली - भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी नेहमीच सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना पाहायला मिळते. सत्तेतील भाजपा सरकारला घरचा अहेर देण्याचं काम स्वामी करतात. आताही, स्वांमींनी कोरोना लसीच्या घोषणेवरुन मोदी सरकारला मोलाचा सल्ला दिलाय. कोरोना लसीच्या उत्साहात चीनच्या अतिक्रमणाला आणि अर्थव्यवस्थेचा उडालेला बोजवारा विसरु नका, असा खोचक टोमणाच स्वामींनी मारला आहे.
सरकारने कोरोना लसीच्या उत्साहात चीनने भारतीय सीमाहद्दीत केलेल्या 4 हजार स्वेअर किमीचा कब्जा केलाय, ते विसरता कामा नये. तसेच, देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. चीनच्या पीपुल्स आर्मीने एलएसीजवळ 30 आधुनिक टँक उभारले असून भारतीय हद्दीत हल्ला करण्यासाठी चीन तयार असल्याचं स्वामींनी म्हटलंय. गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये सीमा रेषेवर मोठा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय अधिकारी आणि सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांची चर्चाही झाली आहे. मात्र, अद्यापही दोन्ही देशांच्या सीमारेषेवरील तणाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. चीनने भारताच्या हद्दीतील लडाखच्या गलवाघ घाटीत रोड निर्माण करण्यास हरकत घेतली होती. त्यावरुन 5 मे रोजी भारत आणि चीनी सैन्यात हाणामारी झाली होती, त्यातूनच 15 जून रोजी चीन आणि भारत देशाच्या सैन्यांत हिंसाचार घडला. त्यामध्ये भारतीय सैन्य दलाचे 20 जवान शहीद झाले होते. त्यामुळे, सुब्रमण्यम स्वामींनी पुन्हा एकदा सरकारला येथील परिस्थितीची आठवण करुन दिलीय.
सुब्रमण्यम स्वामींनी काही दिवसांपूर्वी ट्विट करुन लसीचे टेंडर विदेशी कंपनीला दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. भारत बायोटेक या स्वदेशी कंपनीने तिसऱ्या टप्प्यात 13,000 व्यक्तींचे परिक्षण केले होते. तर, ब्रिटीश लसीच्या कंपनीने केवळ 1200 लोकांचीच चाचणी केली होती. तरीही हे कॉन्ट्रॅक्ट भारतीय कंपनीऐवजी इंग्रजी कंपनीला देण्यात आले. यासह, स्वामींनी पीएमओ कार्यालयात काम करत असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पीएमओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट अधिकारी आहेत. त्यामुळे, पंतप्रधानांनी सर्वप्रथम पूर्वीच्या पीएसएला हटविले पाहिजे, अशी मागणी स्वामींनी केली होती.
पेट्रोल दरवाढीवरुनही सरकारवरुनही केली होती टीका
सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पेट्रोलचे दर देशात 90 रुपये प्रति लिटर झाले असून ती देशातील सर्वसामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक असल्याचं म्हटलं होतं. पेट्रोलचं एक्स रिफायनरी मूळ किंमत 30 रुपये प्रति लिटर एवढी आहे. मात्र, सर्व प्रकारचे टॅक्स आणि पेट्रोल पंपाचे कमिशन मिळून ही किंमत 60 रुपयांनी वाढते. त्यामुळे, पेट्रोलचे प्रति लिटर दर 90 रुपये एवढे आहेत. माझ्या मते पेट्रोलच जास्तीत जास्त किंमत 40 रुपये प्रति लिटर असणे आवश्यक आहे, असेही स्वामींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं होतं.