नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर ती धूरा त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी वड्रा यांनी स्वीकारावी, असा आग्रह पक्षातील एक वर्ग धरत असला तरी स्वत: प्रियांका गांधी यांनी गुरुवारी पक्षाच्या एका बैठकीत ‘मला यात ओढू नका’ असे खडसावून अध्यक्षपदासाठी आपली तयारी नसल्याचा स्पष्ट संकेत दिला.
काँग्रेस कार्यकारिणीच्या ज्या बैठकीत राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्याचे जाहीर केले होते त्यातही लगेच प्रियांका गांधीचे नाव पुढे केले गेले होते. मात्र राहुल गांधींनी ‘नेहरु-गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष शोधा’असे त्याचवेळी सुनावले होते. तरीही राहुल गांधी निर्णयाचा फेरविचार करतील अशी अनेकांना अशा होती. पण राहुल गांधी निर्णयावर ठाम राहिल्याने आता नवा अध्यक्ष शोधण्याखेरीज पर्याय नाही, असे स्पष्ट झाले. गेले काही दिवस पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरेंद्र सिंग व केरळमधील खासदार शशी थरूर यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षाला तरुण नेतृत्वच तारू शकेल, असा आग्रह धरत प्रियांका गांधी यांचे नाव पुढे केले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पक्षाचे सरचिटणीस व विविध राज्याच्या प्रभारी नेत्यांची बैठक झाली. बैठकीचा ठररेला विषय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या येत्या २० आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या ७५ व्या जयंती वर्षाचा होता. सरचिटणीस या नात्याने प्रियांका गांधी बैठकीस हजर होत्या. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, चर्चेच्या ओघात अध्यक्षपदाच्या निवडीचा विषयही निघाला. तेव्हा झारखंडचे पक्षप्रभारी आर.पी.एन. सिंग यांनी राहुल गांधी राजी नाहीत तर प्रियांका गांधी यांनी अध्यक्षपदासाठी पुढे व्हावे, असे सुचविले. यावर प्रियांका गांधी यांनी सिंग व इतर नेत्यांना स्पष्टपणे सांगितले की, यात मला ओढू नका, अध़्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा ही करू नका.
अध्यक्ष निवडीवर विचार करण्यासाठी पक्ष कार्यकारिणीची बैठक केव्हा होणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे. आजच्या बैठकीची माहिती देण्यासाठी झालेल्या वार्तालापात याविषयी विचारता पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी, कार्यकारिणीची बैठक संसदेचे सध्या सुरु असलेले अधिवेशन संपल्यानंतर होईल, असे सांगितले. मात्र बैठक नक्की केव्हा होणार हे त्यांनी सांगितले नाही. संसदेचे अधिवेशन पुढील आठवड्यात संपणे अपेक्षित आहे. अध्यक्षपद सोडले असले तरी राहुल गांधी यांनी पक्षाचे काम सोडलेले नाही व कार्यकारिणीच्या आगामी बैठकीसही ते नक्कीच उपस्थित राहतील, असेही ते म्हणाले.