हिस्सार - हरियाणा राज्यात हिस्सार येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या ३४ व्या अधिवेशनाने डॉ. अशोक ढवळे यांची किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली आणि माजी खासदार हन्नन मोल्ला यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून फेरनिवड केली. १९३६ साली लखनौच्या पहिल्या अधिवेशनात स्थापन झालेली आणि आज २५ राज्यांत दीड कोटीहून अधिक शेतकरी सभासद असलेली अखिल भारतीय किसान सभा ही देशातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी आणि सामर्थ्यशाली संघटना आहे. महाराष्ट्रातून अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले डॉ. अशोक ढवळे हे तिसरे नेते आहेत.
यापूर्वी १९५५ साली डहाणूच्या १३व्या अधिवेशनात क्रांतिसिंह नाना पाटील यांची, व त्यानंतर ३१ वर्षांनी १९८६ साली पाटण्याच्या सुवर्ण महोत्सवी २५व्या अधिवेशनात गोदावरी परुळेकर यांची किसान सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. योगायोगाने त्याच्या ३१ वर्षांनंतर २०१७ साली किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्षपद महाराष्ट्राकडे आले आहे.
यापूर्वी किसान सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी स्वामी सहजानंद सरस्वती, आचार्य नरेंद्र देव, राहुल सांस्कृतायन, मुझफ्फर अहमद, ए. के. गोपालन, बिनय कृष्ण चौधरी, हरकिशन सिंह सुरजीत, एस. रामचंद्रन पिल्ले, आमरा राम हे नेते राहिले आहेत. हिस्सारच्या अधिवेशनात अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय कमिटीवर महाराष्ट्रातून किसन गुजर व डॉ. अजित नवले यांची, आणि राष्ट्रीय कौन्सिलवर सुभाष चौधरी, रडका कलांगडा, अर्जुन आडे व सिद्धप्पा कलशेट्टी यांची निवड झाली आहे.
डॉ. अशोक ढवळे हे १९७८ पासून गेली ४० वर्षे डाव्या चळवळीत सक्रिय आहेत. १९९८ पासून ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कमिटीचे सदस्य आहेत आणि २०१५ पासून ते पक्षाच्या केंद्रीय सचिवमंडळाचे सदस्य आहेत. २००५ ते २०१५ या काळात ते पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव राहिले आहेत. आज ते पक्षाचे मराठी साप्ताहिक मुखपत्र 'जीवनमार्ग'चे संपादक आहेत आणि 'द मार्क्सिस्ट' या पक्षाच्या केंद्रीय वैचारिक त्रैमासिकाच्या संपादक मंडळावर आहेत. 'जनशक्ती प्रकाशन' या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांची विविध विषयांवर पुस्तके व लेख प्रकाशित झाले आहेत.
१९८० ते १९८८ या काळात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व राष्ट्रीय उपाध्यक्ष, आणि १९८९ ते १९९५ या काळात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व पुढे राज्य अध्यक्ष तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्या काळात शिक्षण आणि रोजगाराच्या अनेक ज्वलंत प्रश्नांवर मोठी स्वतंत्र व संयुक्त आंदोलने महाराष्ट्रात झाली.
१९९३ सालापासून गोदावरी परुळेकर यांच्या प्रेरणेतून डॉ. अशोक ढवळे यांनी ठाणे-पालघर जिल्ह्यात किसान सभेचे काम करण्यास सुरुवात केली. १९९५ ते २००१ पर्यंत महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सहसचिव आणि २००१ ते २००९ पर्यंत महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस म्हणून त्यांची निवड झाली.
त्या काळात महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष आमदार जे. पी. गावीत आणि सरचिटणीस डॉ. अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली किसान सभेच्या हजारों कार्यकर्त्यांच्या राज्यव्यापी संचाने अहोरात्र परिश्रम करून जानेवारी २००६ मध्ये अखिल भारतीय किसान सभेचे ३१वे राष्ट्रीय अधिवेशन नाशिक येथे एक लाख शेतकऱ्यांच्या विशाल जाहीर सभेसह यशस्वी केलेे. २००३ पासून डॉ. अशोक ढवळे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव राहिले आहेत.
अलीकडच्या काळात कर्जमुक्ती, रास्त भाव, स्वामिनाथन आयोग, वनाधिकार, दुष्काळ, पीक विमा, सिंचन, वीज, अन्याय्य भूमी अधिग्रहण, महामुंबई एसईझेड, बुलेट ट्रेन अशा प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या सामूहिक नेतृत्वाने जोरदार स्वतंत्र व संयुक्त लढे दिले आहेत.
जून २०१७ पासून गेले चार महिने महाराष्ट्रात शेतकरी सुकाणू समितीच्या नेतृत्वाखाली गाजलेल्या संयुक्त आंदोलनात इतर शेतकरी नेत्यांसोबत डॉ. अशोक ढवळे आणि किसान सभेचे तरुण राज्य सरचिटणीस व सुकाणू समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांचा महत्वाचा सहभाग राहिला आहे.