डॉ. मनमोहन सिंगना कुठून राज्यसभेत नेणार? काँग्रेसमध्ये चर्चा; तामिळनाडूचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 05:08 AM2019-05-14T05:08:32+5:302019-05-14T05:10:28+5:30
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची राज्यसभेची मुदत जूनमध्ये संपत असून, त्यांना आता कोठून निवडून आणायचे, याचा विचार काँग्रेसमध्ये सुरू झाला आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची राज्यसभेची मुदत जूनमध्ये संपत असून, त्यांना आता कोठून निवडून आणायचे, याचा विचार काँग्रेसमध्ये सुरू झाला आहे. ते याआधी आसाममधून निवडून आले होते. पण आता तिथे भाजपचे सरकार असून, त्यांना निवडून येण्यासाठी तिथे आवश्यक ती मते मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे अन्य कोणत्या राज्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवायचे, याबाबत विचारविमर्ष सुरू आहे.
नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर ज्याप्रकारे डॉ. मनमोहिन सिंग यांनी हल्ला चढवला ते पाहता, काँग्रेसला त्यांची यापुढेही राज्यसभेत गरज भासणार आहे.
त्यामुळे तामिळनाडूमधून ते राज्यसभेत जाऊ शकतात. तेथील सहा सदस्य २४ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. तामिळनाडूतील राज्यसभेचे जे सदस्य निवृत्त होणार आहेत, त्यात अण्णा द्रमुकचे चार, द्रमुकचा एक व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा एक यांचा समावेश आहे. द्रमुकच्या निवृत्त होणाऱ्या सदस्य आहेत कणिमोळी. त्या तुतीकोडीमधून लोकसभेची निवडणूक लढवत असून, त्या विजयी होतील, अशी द्रमुकला खात्री आहे. त्या जागेसाठी डॉ. सिंग यांचा विचार होईल, असे दिसते.
जुळवाजुळवीचे गणित
गेल्या वेळी द्रमुकच्या पाठिंब्यावरच भाकपचे सरचिटणीस डी. राजा निवडून आले होते. यंदा ते व डॉ. सिंग अशा दोघांना राज्यसभेवर पाठवायचे, तर द्रमुकचा एकही उमेदवार निवडून जाणार नाही. मात्र अण्णा द्रमुकमध्ये पडलेली फूट व फुटीर गटाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता याआधारे द्रमुकचा एक तसेच डॉ. सिंग व डी. राजा असे तिघे विजयी होतील, असे काँग्रेसचे गणित आहे.