CoronaVirus News : रशियाचा डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजशी करार; इंडियन इम्युनॉलॉजिकल्सशीही चर्चा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 01:04 AM2020-09-17T01:04:29+5:302020-09-17T06:23:57+5:30
स्पुटनिक व्ही या लसीच्या भारतातील मानवी चाचण्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) व डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज हे संयुक्तपणे पार पाडणार आहेत.
नवी दिल्ली : रशियाने बनविलेल्या स्पुटनिक व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या पार पाडण्यासाठी, तसेच लसीचे १० कोटी डोस पुरविण्याबाबत त्या देशाने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या भारतीय कंपनीशी करार केला आहे, तसेच या लसीचे उत्पादन करण्यासाठी रशियाने इंडियन इम्युनॉलॉजिकल्स लिमिटेड या दुसऱ्या भारतीय कंपनीशीही चर्चा सुरू केली असून, तिच्याशीही करार होण्याची शक्यता आहे.
स्पुटनिक व्ही या लसीच्या भारतातील मानवी चाचण्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) व डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज हे संयुक्तपणे पार पाडणार आहेत. स्पुटनिक व्ही या लसीच्या ३० कोटी डोसचे उत्पादन करण्यासाठी रशियाने भारताशी याआधीच करार केला आहे. आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी दमित्रिव यांनी सांगितले की, स्पुटनिक व्हीच्या मानवी चाचण्या यशस्वी झाल्या तर ही लस लवकरात लवकर म्हणजे नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये उपलब्ध होईल. या लसीच्या उत्पादनासाठी आरडीआयएफ आणखी चार भारतीय कंपन्यांशी चर्चा करीत आहे. त्यामध्ये इंडियन इम्युनॉलॉजिकल्स या कंपनीचाही समावेश असून, ती हैदराबादची कंपनी आहे.
दमित्रिव म्हणाले की, स्पुटनिक व्ही लसीच्या मानवी चाचणीच्या पहिल्या व दुसºया टप्प्याचे प्रयोग यशस्वी झाले असून, तिसºया टप्प्यातील प्रयोग भारतात करण्यात येतील. भारतात स्पुटनिक- व्ही या लसीला मान्यता मिळाल्यानंतर उत्पादनाला सुरुवात करता येईल.
चाचण्या पुन्हा सुरू करण्यास सिरमला परवानगी
आॅक्सफर्ड व अॅस्ट्राझेनिसा विकसित करीत असलेल्या लसीच्या मानवी चाचण्या पुन्हा सुरू करण्यास केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला संमती दिली आहे. या लसीच्या मानवी चाचण्यांत सहभागी झालेल्या एकाची तब्येत बिघडल्यामुळे त्या देशासह भारतात या चाचण्या काही दिवस थांबविण्यात आल्या होत्या. या लसीच्या मानवी चाचण्या भारतात सिरम इन्स्टिट्यूट पार पाडत आहे.