नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरुनसंसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारविरोधात विरोधकांचा हल्लाबोल सुरूच आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्ष मणिपूरच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांचे खासदार आज काळे कपडे परिधान करून सभागृहात पोहोचले आणि केंद्र सरकारचा निषेध केला.
गुरुवारी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात विरोधी पक्षांची बैठक झाली. ज्यामध्ये सभागृहाच्या कामकाजाच्या रणनीतीवर चर्चा झाली. या बैठकीत १७ पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. दरम्यान, मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधक चर्चेवर ठाम असून त्यासाठीच अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या बैठकीत काँग्रेस, टीएमसी, डीएमके, सीपीआय(एम), आरजेडी, एसपी, एनसीपी, एसएस, आप, सीपीआय, आययूएमएल, आरएलडी, केसी(एम), जेएमएम, जेडी (यू), आरएसपी, व्हीसीके या पक्षांचा समावेश होता.
विरोधकांचा केंद्र सरकारवर निशाणाशिवसेना (ठाकरे गट) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. "आम्ही काळे कपडे घालून निषेध करण्यासाठी आलो आहोत. आज संसदीय लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान आपले मौन सोडत नाहीत", असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या. तर लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणाऱ्या गौरव गोगोई यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, पंतप्रधान मणिपूरच्या लोकांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, देशाचा भाग जळण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि पंतप्रधान केवळ भाषणात व्यस्त आहेत.
अविश्वास प्रस्तावावर लवकरच होणार चर्चा दरम्यान, बुधवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला मंजुरी देण्यात आली आहे. सभापती ओम बिर्ला यांनी गौरव गोगोई यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या अविश्वास प्रस्तावावर चर्चा केव्हा आणि किती काळ होणार याबाबत लवकरच चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना सतत चर्चा करण्यास सांगितले. अमित शाह म्हणाले की, "प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी स्वतः देईल". मात्र, सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच उत्तर दिले पाहिजे, या भूमिकेवर विरोधक ठाम होते. यामुळेच मणिपूर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता.