नजर हटी दुर्घटना घटी; गार्डनमध्ये जोडप्यांना पाहताना बसवरील नियंत्रण सुटलं, 10 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 06:08 PM2018-05-21T18:08:59+5:302018-05-21T18:08:59+5:30
जखमींमधील तिघांची प्रकृती गंभीर
कोलकाता : पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये एका बसनं व्हॅनला दिलेल्या धडकेत 10 जण जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. चालक रस्त्याशेजारील बागेतील जोडप्यांना पाहण्यात मग्न असल्यानं त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे हा अपघात झाला.
घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि मिनी बसमधून प्रवास करणाऱ्या सुकुनार अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस दुर्गापूरहून सिटी सेंटरच्या दिशेनं जात होती. 'बस त्रोयका पार्क परिसरातून जात असताना चालकाचं लक्ष बागेत असलेल्या जोडप्यांकडे गेलं. चालक जोडप्यांकडेच पाहत राहिल्यानं त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्याचवेळी समोरुन येणारी पिकअप व्हॅन त्याला दिसली नाही आणि बसनं व्हॅनला जोरदार धडक दिली,' असं अधिकारी यांनी सांगितलं.
या अपघातात पिकअप व्हॅनचा चालक मोहम्मद अशरफ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 'मी सतत हॉर्न वाजवत होतो. मात्र बस चालकाचं लक्षच नव्हतं. मी धडक टाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र त्यात मला अपयश आलं,' असं मोहम्मदनं सांगितलं. अपघातानंतर बस चालकानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.