हेलिकॉप्टरमधून उतरताना दोरखंड तुटला; ३ जवान जखमी, परेड मैदानावरील घटना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:54 AM2018-01-12T00:54:18+5:302018-01-12T00:54:57+5:30
ध्रुव हेलिकॉप्टरला बांधलेल्या दोरखंडाला धरून सरसर उतरण्याचा सराव करताना तो अचानक तुटल्याने लष्कराचे तीन जवान खाली पडून किरकोळ जखमी झाले. लष्कराच्या परेड मैदानावर मंगळवारी हा अपघात झाला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : ध्रुव हेलिकॉप्टरला बांधलेल्या दोरखंडाला धरून सरसर उतरण्याचा सराव करताना तो अचानक तुटल्याने लष्कराचे तीन जवान खाली पडून किरकोळ जखमी झाले. लष्कराच्या परेड मैदानावर मंगळवारी हा अपघात झाला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
हेलिकॉप्टरला बांधण्यात आलेला दोरखंड धरून जवानांना खास मोहिमेसाठी एखाद्या भागात उतरविले जाते. या कवायतींचा सराव चालू असताना ही दुर्घटना घडली. चौकशी पूर्ण होईपर्यंत ध्रुव हेलिकॉप्टरने करण्यात येणाºया युद्धाभ्यासाचा सराव रद्द करण्यात आला आहे.
लष्कर दिनानिमित्त १५ जानेवारी रोजी चित्तथरारक कसरती सादर करण्यात येणार होत्या. त्याचीच रंगीत तालिम सुरू होती. हेलिकॉप्टर जमिनीपासून ५० फूट उंचीवर स्थित होते. हेलिकॉप्टरला बांधलेला दणकट दोरखंप पकडून एक जवान खाली यायला निघताच, दुसराही उतरू लागला. तो मध्यावर असताना तिसरा जवान खाली निघताच दोरखंड आकड्यातून सुटला व तिन्ही जवान जखमी झाले. सर्वात वरचा जवान त्यावेळी ४0 फूट उंचीवर होता.
काय आहे ध्रुव हेलिकॉप्टर?
ध्रुव हेलिकॉप्टर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने विकसित केले आहे. सशस्त्र दल या हेलिकॉप्टरचा उपयोग करतात. ध्रुवने २० आॅगस्ट १९९२ रोजी प्रथम उड्डाण केले होते. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलात या हेलिकॉप्टरचा उपयोग केला जातो. या एका हेलिकॉप्टर तयार करायला ४० कोटी रुपये खर्च येतो. उंच भरारी हे या हेलिकॉप्टरचे वैशिष्ट्य आहे.