गुजरातमध्ये शाळकरी मुलांकडून ड्रग्जची तस्करी, पोलीस दलातही खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 10:47 AM2021-12-03T10:47:04+5:302021-12-03T10:53:01+5:30
या मुलाच्या शाळेच्या दफ्तरमध्ये 1.980 किलो अफीम आढळून आला. या मुलाच्या गावातील गोपाल शर्मा नावाच्या व्यक्तीने हा अफीम राजस्थानमधून सुरतला पाठविण्याचे सांगितले होते.
अहमदाबाद - गुजरातमध्ये गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठी आढळून आला होता. त्यानंतर, आता ड्रग्जमाफिया अवैध धंद्यांची, ड्रग्ज, अफीमच्या तस्करीसाठी शाळकरी मुलांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. येथील पोलिसांनी इयत्ता 9 वी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला अफीमची तस्करी केल्याप्रकरणी ताब्यात घेतल्याने ही बाब उघडकीस आली आहे. या घटनेनं पोलीस दलातही खळबळ उडाली आहे. या शाळकरी मुलाच्या दफ्तरातील वॉटर बॉटलमधून ही तस्कीर केली जात होती.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याकडे तब्बल 2 किलो अफीम आढळून आले असून हा शाळकरी मुलगा राजस्थानातून सुरतला आला होता. या मुलाकडे आढळून आलेल्या अफीमची बाजारात किंमत 1.98 लाख रुपये असल्याचे विद्यार्थ्यानेच सांगितले. सुरतमधील पुना पोलीस ठाण्यातील पोलिसांनी 16 वर्षीय विद्यार्थ्याच्या अफीम तस्करीबाबतची टीप मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून निओल चेक पोस्ट येथून 16 वर्षांच्या शाळकरी मुलाला अटक केली. या मुलाच्या शाळेच्या दफ्तरमध्ये 1.980 किलो अफीम आढळून आला. या मुलाच्या गावातील गोपाल शर्मा नावाच्या व्यक्तीने हा अफीम राजस्थानमधून सुरतला पाठविण्याचे सांगितले होते.
सुरत पोलीसचे एसपी धर्मेंद्र सिंह चावडा यांनी सांगितले की, गोपाल शर्मा नावाच्या ड्रग्जमाफियाने राजस्थानहून सुरतला अफीम तस्करीसाठी शाळकरी मुलांचा वापर केला. पोलिसांनी शाळकरी मुलाला अटक केली असून आता गोपाळ शर्माचा शोध सुरू आहे. राजस्थानच्या जिल्हा चित्तोडगढमधील बेगू तालुक्यात इटावा गावचा गोपाळ शर्मा रहिवाशी आहे. या कामासाठी गोपाश शर्माने मुलाला 5 रुपये दिले होते, असे मुलाने पोलिसांना सांगितले. तसेच, मला अफीम खेरदी करणाऱ्या व्यक्तीची काहीही माहिती नसल्याचेही त्याने म्हटले.