...'या' कारणांमुळे चीनला भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या एकत्र येण्यापासून धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 06:37 PM2017-11-13T18:37:17+5:302017-11-13T18:40:43+5:30
मनिला येथे सुरु असलेल्या एशियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची बैठक होणार आहे.
नवी दिल्ली - मनिला येथे सुरु असलेल्या एशियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची बैठक होणार आहे. या बैठकीमुळे चीन चिंतेत असून, संबंधित देशांनी सर्व समावेशकचा मार्ग अनुसरावा. कुठल्या तिस-या पक्षाला वगळू नये असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. चारही देशांच्या मैत्रीपूर्ण सहकार्याचे आम्ही स्वागत करतो पण तिस-या पक्षाला टार्गेट करु नये असे चीनने म्हटले आहे.
आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव कमी करण्यासाठी हे चार देश एकत्र येत असल्याची चीनची भावना आहे. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांच्या बैठकीमुळे प्रदेशामध्ये शांतता, विकास, सहकार्य आणि समृद्धी वाढेल अशी अपेक्षा आहे. या बैठकीतून कुणाच्याही हिताला बाधा पोहोचणार नाही किंवा कुणाला लक्ष्य करणार नाही अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मागच्या आठवडयात व्यक्त केली होती.
- राजकीय दृष्टीकोनातून पाहिल्यास चार देशांनी एकत्र येणे हा चीनसाठी एकप्रकारचा धोकाच आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे लोकशाही प्रधान देश आहे तर चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाचीच सत्ता चालते.
- हे चार देश लष्करी दृष्टया एकत्र आल्यास इंडो-पॅसिफिक प्रदेशात खेळाचे सर्व नियमच बदलून जातील. जगातील एकमेव सुपरपॉवर अमेरिका या देशांसोबत आहे.
- या चार देशांबरोबरच्या व्यावसायिक, व्यापारी संबंधांमध्ये चीनचा जास्त फायदा आहे. हे चारही देश एकत्रितपणे व्यापार संतुलन साधण्यासाठी चीनवर दबाव आणू शकतात.
- हे चारही देश चीनच्या वन बेल्ट वन रोड धोरणासमोर आव्हान निर्माण करु शकतात. वन बेल्ट, वन रोड ही शी जिनपिंग यांचे महत्वकांक्षी योजना आहे.