इंदूर, दि. 19 - मध्यप्रदेशची आर्थिक राजधानी इंदूर येथील एका जिममध्ये तरुणीला लाथा, बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहताना मारहाण करणा-या तरुणाची अमानुषता दिसून येते. पीडित तरुणी जिममध्ये व्यायाम करत असताना तिचा तिथेच व्यायाम करणा-या एका तरुणाबरोबर वाद झाला. हा तरुण युवतीच्या व्यायामामध्ये अडचणी निर्माण करत होता. त्यामुळे अखेर कंटाळून या तरुणीने प्रशिक्षकाकडे तक्रार केली.
तरुणीने तक्रार केल्याचे समजल्यानंतर या तरुणाचा संताप अनावर झाला. त्याने सरळ या तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी जिममध्ये उपस्थित असलेल्या काही जणांनीमध्ये हस्तक्षेप करुन ही मारहाण थांबवली. मारहाणीत तरुणीला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपी तरुणाविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आमचा तपास सुरु आहे असे डीएसपी शशिकांत कानकाने यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार जिममध्ये कॉलेजच्या सात तरुणांचा एक ग्रुप वर्कआउट करण्यासाठी येतो. यात चार तरुणी आणि तीन युवक आहेत. या ग्रुपमधील एक तरुणी आणि एका तरुणामध्ये काही कारणावरुन वाद झाला होता. गुरुवारी संध्याकाळी तरुणी वर्कआऊट करत असताना तरुण तिला त्रास देत होता. जेव्हा तरुणीने या प्रकाराची तक्रार केली तेव्हा संतापलेल्या तरुणाने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे इंदूरच्या या जिममध्ये व्यायामासाठी येणा-या महिलांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिममध्ये सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे संचालकाने सांगितले. मग तरीही मग तरुणीला कशी मारहाण झाली ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मारहाण केल्यानंतर तरुण तिथून फरार झाला. पीडित तरुणीने तिच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी भंवरकुआ स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली.
दिल्लीतही महिलेचा विनयभंगदिल्लीमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याची साडी खेचून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लैंगिक जबरदस्तीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. महत्वाचं म्हणजे ज्या अधिकाऱ्याने हे कृत्य केले त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पीडित महिलेने तक्रार केली म्हणून तिलाच नोकरीवरुन काढून टाकण्यात आले.