दुर्गापूजेला हिंसा खपवून घेतली जाणार नाही, मुहर्रमदरम्यान मुर्ती विसर्जन नाही - ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 07:02 PM2017-09-16T19:02:12+5:302017-09-16T19:21:16+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या सणाच्या पार्श्वभुमीवर चेतावणी देताना सणांच्या नावाखाली राजकारण खपवून घेतलं जाणार नाही असं सांगितलं आहे. तसंच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुहर्रमच्या दिवशी दुर्गाविसर्जन होणार नाही हे स्पष्ट केलं आहे
कोलकाता, दि. 16 - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या सणाच्या पार्श्वभुमीवर चेतावणी देताना सणांच्या नावाखाली राजकारण खपवून घेतलं जाणार नाही असं सांगितलं आहे. तसंच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुहर्रमच्या दिवशी दुर्गाविसर्जन होणार नाही हे स्पष्ट केलं आहे. याआधीही ममता बॅनर्जी यांनी मुहर्रमच्या दिवशी दुर्गा विसर्जन करू नये आणि हिंदू व मुस्लीमांनी सौहार्दाचं वातावरण ठेवावं असं आवाहन केलं होतं.
ममता बॅनर्जी बोलल्या आहेत की, 'दुर्गापूजेदरम्यान कोणतीही हिंसा खपवून घेतली जाणार नाही. मुहर्रमदरम्यान मुर्ती विसर्जन होणार नाही. सणांच्या नावाखाली होणारी हिंसा खपवून घेतली जाणार नाही'. पश्चिम बंगालमध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे हा महिना संवेदनशील असणार आहे.
No violence will be tolerated during Durga Puja. No idol immersion on Muharram. Politics shouldn't be done in name of festivals: WB CM pic.twitter.com/wqnURPZrcn
— ANI (@ANI) September 16, 2017
या वर्षी दस-च्या दुसऱ्या दिवशी मुहर्रम येत आहे. याच दिवशी दुर्गा विसर्जन करण्यात येतं. त्यामुळे दोन्ही मिरवणुका समोरासमोर आल्या तर तणावाचं वातावरण होऊ शकतं, अनुचित प्रकार घडू शकतात, त्यामुळे दुर्गा विसर्जन या दिवशी न करण्याचं आवाहन बॅनर्जी यांनी केलं होतं. एकमेकांना सहकार्य करा आणि सौहार्दाचं वातावरण राखा असं त्यांनी म्हटलं होतं.
धार्मिक तेढ निर्माण व्हावं यासाठी काही घटक लोकांना भडकवतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त करताना त्याचा राजकीय फायदाही उठवला जाईल अशी शक्यता बॅनर्जी यांनी उपस्थित केली होती. दुर्गा पूजा समित्यांची त्यांनी बैठक बोलावली होती, यावेळी त्यांनी ही मते व्यक्त केली होती. काही जण राजकीय लाभ पदरात पाडण्यासाठी झटत आहेत, अशावेळी आपण कशाला अंगावर बालंट घ्यायचं असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
बॅनर्जी यांनी पोलीस अधिक्षकांना राज्यभरात जिल्हा पातळीवरील दुर्गा समित्यांशी व मुहर्रम समित्यांशी चर्चा करण्याचे आदेश दिले होते. एक ऑक्टोबर रोजी मुहर्रम आहे आणि त्याचदिवशी पारपंरिकरीत्या दुर्गा विसर्जनाचा दिवस यंदा येत आहे. रेड रोड कार्निवल 3 ऑक्टोबर रोजी करण्याचे व दुर्गा विसर्जनासाठी 4 ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्याचे त्यांनी सांगितले होते. समाजात तेढ वाढेल अशा सोशल मीडियातील पोस्टना बली पडू नका असं आवाहनही त्यांनी केलं होतं.