केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. याचा लाभ केंद्रीय कर्मचारी आणि निवृती वेतनधारकांना मिळणार आहे. सरकारकडून महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीआधीच सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळालं आहे.
मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. याआधी महागाई भत्त्यात केवळ २ ते ३ टक्क्यांनी वाढ व्हायची. मात्र मोदी सरकारनं महागाई भत्ता ५ टक्क्यांनी वाढवल्याचं जावडेकर म्हणाले. सध्या केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना १२ टक्के महागाई भत्ता मिळवतो. आता तो १७ टक्क्यांवर गेला आहे. महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्यात आल्यानं सरकारी तिजोरीवर १६ हजार कोटींचा भार पडेल. मोदी सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचा लाभ सध्या सेवेत असलेल्या ५० लाख कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती घेतलेल्या ६५ लाख कर्मचाऱ्यांना होईल, असं जावडेकर म्हणाले. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच मोठं गिफ्ट मिळालं आहे.