पटना : गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रात आलेल्या मरगळीमुळे देशावरील मंदीचे सावट गडद होत असतानाचा आर्थिक परिस्थितीही बिकट बनली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये देशाचा जीडीपी घटून पाच टक्क्यांवर आला आहे. गेल्या सहा वर्षांतील जीडीपीच्या वाढीचा हा निचांक आहे. जीडीपीच्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली घट हा मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांसाठी धक्का मानला जात आहे. याचत बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर टिप्पणी केली आहे.
सुशील मोदी यांनी श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मंदी असल्याचे म्हटले आहे. सुशील मोदी यांनी यासंबंधी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सहसा दरवर्षी श्रावण आणि भाद्रपदमध्ये अर्थव्यवस्थेत मंदी असते. मात्र, यावेळी राजकीय पक्ष मंदी जास्त असल्याचे सांगत निवडणुकीतील पराभवाचा राग काढत आहेत.' याचबरोबर, देशातील आर्थिक मंदीवर काही चिंता करण्याची गरज नाही. केंद्र सरकार यावर अनेक उपाय - योजना आखत आहे, असे सुशील मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, 'केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेत तेजी आणण्यासाठी 32 सुत्री दिलासा देणाऱ्या निधीची घोषणा केली आहे. दहा सरकारी बँकांचे विलीनीकरण केले आहे. सरकारच्या या निर्णयाचा प्रभाव येत्या तिमाहीत दिसेल.'
दरम्यान, श्रावण आणि भाद्रपद मराठी दिनदर्शिकेत पाचवा व सहावा महिना असतो. असे मानले जाते की, या महिन्यात नवीन साहित्य खरेदी केले जात नाही किंवा नवीन कामाची सुरुवात केली जात नाही. तसेच, भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावस्या हा पंधरा दिवसांचा कालावधी 'पक्ष पंधरवडा' म्हणून पाळला जातो. त्यामुळे या पंधरवड्यात नवीन खरेदी करू नये, शुभ कार्ये टाळावी, असे बरेचजण मानतात.