तामिळनाडूत छापे, ED कडून भाजपच्या अकाउंटन्टची चौकशी; काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 03:00 PM2023-09-27T15:00:05+5:302023-09-27T15:00:43+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान ईडीने भाजप कार्यालयात कामाला असलेल्या एका अकाउंटन्टचीही चौकशी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूतील वाळू माफियांवर ईडीची कारवाई सुरू आहे. यातच, मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने थ्यागराय नगरमधील दोन घरांवर छापा टाकला, या घरांचे मालक रिअल्टर असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान ईडीने भाजप कार्यालयात कामाला असलेल्या एका अकाउंटन्टचीही चौकशी केली आहे.
संबंधित अकाउंटन्ट रिअल्टरच्या घरात भाड्याने राहतो. संबंधित घरात तपासणी करत ईडीने रिअल्टरचीही चौकशी केली. माध्यमांतील वृत्तांनुसार, खाण माफियांनी रिअल्टरकडे मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर केले होते. यामुळे ईडीने ही चौकशी केली. यासंदर्भात, भाजप सूत्रांनी सांगितले की, हा छापा अकाउंटन्टवर नसून संबंधित रिअल्टरची मालकी असलेल्या परिसरात झाला. तसेच संबंधित अकाउंटन्ट रिअल्टरच्या घरात भाड्याने राहत असल्यामुळे त्याची चौकशी झाली.
सर्वसाधारणपणे, छापेमारीनंतर ईडीकडून निवेदन जारी केले जाते. मात्र यावेळी असे झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडी खाण माफियांशी संबंधित काही दस्तएवजांच्या शोधात आहे. महत्वाचे म्हणजे, तपासात काय हाती लागले, यासंदर्भात अद्याप ईडीने कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही.
यापूर्वी 12 सप्टेंबरला ईडीने एकूण 34 ठिकानी छापेमारी केली होती. तामिळनाडूतील 6 जिल्ह्यांमध्ये चालवल्या गेलेल्या ऑपरेशन दरम्यान ईडीने खाणी ठेकेदार के. रतिनम, एस. रामचंद्रन आणि कारिकलन यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली होती. याशिवाय इतरही काही ठिकाणी ईडीने चौकशी केली होती.