कर्ज घोटाळ्यात ईडीच्या धाडी; ४८१ कोटींच्या मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 03:42 AM2019-08-02T03:42:31+5:302019-08-02T03:42:36+5:30

मनी लाँड्रिंग प्रकरण : बासमती तांदूळ प्रक्रिया कंपनीविरोधात कारवाई

ED scandals in debt scam; 3 crore worth of property seized | कर्ज घोटाळ्यात ईडीच्या धाडी; ४८१ कोटींच्या मालमत्ता जप्त

कर्ज घोटाळ्यात ईडीच्या धाडी; ४८१ कोटींच्या मालमत्ता जप्त

Next

नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी बासमती तांदूळ प्रक्रिया उद्योगातील आघाडीची कंपनी आरईआय अ‍ॅग्रो लिमिटेडच्या तळांवर छापे मारले. या छाप्यांत कंपनीच्या ४८१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत.

ईडीने कंपनीविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये हंगामी जप्ती आदेश काढला होता. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. २०१६ मध्ये ईडीने कंपनीविरुद्ध मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. आरईआय अ‍ॅग्रो लि. ही जगातील सर्वांत मोठी बासमती तांदूळ प्रक्रिया कंपनी आहे. कंपनीविरुद्ध ३,८७१.७१ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळ्याचा आरोप आहे. याचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. ईडीच्या निवेदनातील माहितीनुसार, कंपनीच्या ४८१.०४ कोटी रुपये किमतीच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांत जमिनी, इमारती, प्रक्रिया प्रकल्प व यंत्रे यांचा समावेश आहे. याशिवाय कंपनीची कार्यालये आणि कंपनीच्या मालकीची काही पवन ऊर्जा क्षेत्रेही जप्त करण्यात आली आहेत. कोलकतास्थित फॉर्च्युन समूहाच्या चार कंपन्यांची ५० टक्के भागीदारी असलेल्या काही मालमत्ताही या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आल्या आहेत.

कंपनीचे संचालक संदीप झुनझुनवाला, संजय झुनझुनवाला आणि इतरांना विविध बँकांकडून क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. युको बँकेच्या कॉर्पोरेट शाखेचा त्यात समावेश होता. या सुविधेचा वापर करून बँकांना २०१३ पासून फसविण्यात येत होते. यामुळे बँकांना तब्बल ३,८७१.७१ कोटी रुपयांचा फटका बसला. ज्या कारणांसाठी कर्ज घेण्यात आले, त्यासाठी हा पैसा संचालक वापरतच नव्हते. हा पैसा अन्यत्र वळविण्यात येत होता. युको बँकेच्या नेतृत्वाखालील १४ बँकांना फसविल्याप्रकरणी संदीप झुनझुनवाला यांना अटकही करण्यात आली होती.

अशी केली बँकांची फसवणूक
बँकांना फसविण्यासाठी कंपनीने बनावट बिले सादर करणे, थेट अथवा ताब्यातील कंपन्यांच्या माध्यमातून वरसना इस्पातमध्ये गुंतवणूक करणे, विविध शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या रकमा आगाऊ उचलणे, खोटी खरेदी बिले दाखवून बांधकामांची जास्तीची किंमत दाखवणे, अशा पद्धतींचा वापर कंपनी करीत होती.

Web Title: ED scandals in debt scam; 3 crore worth of property seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.