उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये एका वृद्ध व्यक्तीला पेन्शनसाठी सून आणि मुलीने घरात कैद करून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी आणि सुनेने या वृद्धाला एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल दोन महिने घरात कोंडून ठेवलं. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घराचं कुलूप तोडून वृद्धाची सुटका केली.
पोलिसांनी वृद्धाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हे खळबळजनक प्रकरण शहरातील कोतवाली भागातील ग्वाल मंडीचे आहे. मिस्रिख कोतवाली भागात राहणारे स्वराज प्रकाश अवस्थी हे निवृत्त कर्मचारी होते. त्यांना 30 हजार रुपये पेन्शन मिळत होतं. ते शहरातील कोतवाली भागातील मोहल्ला ग्वाल मंडी येथे राहत होते.
विनोद आणि प्रदीप ही त्यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा प्रदीपचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. मुलगा विनोद याने पोलिसांना सांगितले की, त्याचे वडील स्वराज हे प्रदीपच्या पत्नीसोबत राहतात. अनेकवेळा त्याने वडिलांना भेटण्याचा प्रयत्न केला असता भावाच्या पत्नीने त्याला भेटू दिले नाही. वृद्धाला कोंडून ठेवल्याची माहिती मिळताच शहर पोलीस कर्मचारी आलोक मणि त्रिपाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले असता महिलेने दरवाजा उघडण्यास नकार दिला.
महेंद्र यांच्या उपस्थितीत निरीक्षकांनी कुलूप तोडले. पोलीस घराच्या आत पोहोचले तेव्हा वृद्ध व्यक्ती अत्यंत वाईट अवस्थेत बेडवर पडली होती. पोलिसांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचारादरम्यान वृद्ध स्वराज यांचा मृत्यू झाला. तक्रार आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.