१२ राज्यातील विधानसभेच्या ५६ जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा, MP, UPमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला
By बाळकृष्ण परब | Published: September 29, 2020 05:14 PM2020-09-29T17:14:05+5:302020-09-29T17:21:59+5:30
देशातील १२ राज्यांमधील विधानसभांच्या ५६ जागांसाठी आणि लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा आज भारतीय निवडणूक आयोगाने केली आहे
नवी दिल्ली - भारतीय निवडणूक आयोगनाचे आज देशातील १२ राज्यांमधील विधानसभांच्या ५६ जागांसाठी आणि लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये मध्य प्रदेशमधील सर्वाधिक २७ विधानसभा मतदारसंघात तर उत्तर प्रदेशमधील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. तर केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पश्चिम बंगालमधील सात विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक न घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील एक लोकसभा मतदारसंघ आणि मणिपूरमधील २ विधानसभा मतदारसंघांमध्ये ७ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. तर छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, नागालँड, ओदिशा, तेलंगाणा आणि उत्तर प्रदेशमधील मिळून ५३ विधानसभा मतदारसंघामध्ये ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या सर्व मतदारसंघातील मतमोजणी ही १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी केलेल्या विनंतीवरून तेथील पोटनिवडणूक टाळण्यात आली आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशमधील स्वार मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत अद्याप कुठलीही घोषणा निवडणूक आयोगाने केलेली नाही.
मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या २२ समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्याने मार्च महिन्यात कमलनाथ सरकार कोसळले होते. तर भाजपाच्या दोन आमदारांचं निधन झाल्याने दोन जागा रिक्त झाल्या आहेत. तर अजून तीन आमदारांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपाचे सदस्यत्व स्वीकारला होते. त्यामुळे रिक्त झालेल्या एकूण २७ मतदारसंघांमध्ये ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशमधील सात विधानसभा मतदारसंघांमध्येदेखील पोटनिवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये ज्या सात मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे त्यापैकी सहा मतदारसंघात भाजपाचे आमदार होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.