राहुल गांधी यांना वृत्तवाहिनीच्या मुलाखतप्रकरणी पाठवलेली नोटीस निवडणूक आयोगाने घेतली मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 09:28 AM2017-12-18T09:28:27+5:302017-12-18T10:04:23+5:30
निवडणूक आयोगाने वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविलेली नोटीस मागे घेतली आहे.
नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविलेली नोटीस मागे घेतली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान वृत्तवाहिनीला राहुल गांधी यांनी मुलाखत दिली होती. निवडणूक आयोगाने 13 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांना नोटीस पाठविली होती. राहुल गांधी यांना 18 डिसेंबरपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर देण्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. राहुल गांधी यांना या नोटीसीचं योग्य उत्तर दिलं नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. तसंच राहुल गांधी यांची मुलाखत दाखविणाऱ्या वृत्तवाहिनीच्याविरोधातही तक्रार दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.
निवडणूक आयोगानुसार मतदानाच्या एक दिवस आधी मुलाखत दाखविणं आचारसंहीतेचं उल्लंघन आहे. मुलाखत दाखविणाऱ्या प्रत्येक वृत्तवाहिनीविरोधात कारवाई केली जाणार आहे, असं आयोगाने म्हटलं.
निवडणूक आयोगाने म्हंटलं की, राहुल गांधी यांना ज्याअंतर्गत नोटिस जारी केली होती त्या कायदेशीर तरतुदी पुन्हा तपासून पाहिल्या जातील. नोटीस परत घेण्याबरोबच आयोगाने म्हटलं, निवडणूक आयोगाच्या मते डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा विस्तार अती जास्त झाला आहे. त्यामुळे आरपी अॅक्ट 1951च्या कलम 126 आणि त्या संबंधित इतर तरतुदींवर पुन्हा चर्चा करणं गरजेचं आहे. निवडणूक आयोग लवकरच राजकीय पक्ष, मीडिया आणि इतर पक्षांशी विचारविनिमय करणार आहे. त्यानंतर कमिटी स्थापन केली जाणार असून ही कमिटी आयोगाला रिपोर्ट सादर करेल.
प्रचार संपल्यानंतर आचारसंहीतमध्ये राहुल गांधी यांनी वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्यामुळे भाजपाने त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याच तक्रारीनंतर आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस पाठविली होती.