नवी दिल्ली : लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी व्हायला हव्यात, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आज व्यक्त केली. सातत्याने सुरु असलेल्या निवडणुकांच्या चक्रामुळे प्रचंड पैसाहीखर्च होतो. सरकारी कामकाजावरही त्याचा विपरित परिणाम होतो, असेही ते म्हणाले.सणांचे दिवस जसे ठरलेले असतात तसे निवडणुकांचेही दिवस ठरावेत. जेणेकरुन निवडणुका या ठराविक कालमर्यादेत पार पडतील. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारांना पाच वर्षे राज्यकारभारावर लक्ष केंद्रीत करणे शक्य होईल.लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकच मतदार यादी प्रचलित झाली पाहिजे. या सर्व निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात हा आग्रह केवळ मी तसेच भाजपनेच धरणे संयुक्तिक होणार नाही. या विषयावर सर्व पक्षांनी चर्चा केली पाहिजे व सहकार्याचा हात पुढे करावा, असे आवाहनही मोदी यांनी केले. २०१९ साली होणाºया लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून येत्या १ फेब्रुवारीचा अर्थसंकल्प तयार करण्यात येणार नाही. विकास हा मुद्दा केंद्रस्थानी असेल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. आधीच्या सरकारांनी निवडणुकांसाठीच फक्त सत्ता राबविली. आम्ही मात्र देशाचा फायदा व्हावा या हेतूनेच सरकार चालवत आहोत. देशाच्या जातीपातीच्या आधारावर राजकारण केले जाते. ते दुर्दैवी आहे. परंतु, माझे सरकार मात्र प्रत्येकाच्या विकासासाठी झटणारे आहे.जीडीपी घसरल्यानंतर झालेल्या टीकेबद्दल ते म्हणाले की, याबद्दल वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. टीका करणे, होणे हे लोकशाहीचे बलस्थान आहे. प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण व्हायला हवे. पण काही वेळेस टीकेपेक्षा आरोप करण्यावरच भर दिला जातो. जीएसटी व नोटाबंदीचा निर्णय इतकेच आमच्या सरकारचे योगदान नाही तर विद्युतपुरवठा, शौचालय बांधणी, देशाच्या आर्थिक आघाडीवर केलेली प्रगती ही सरकारने केलेली कामेही महत्वाची आहेत. भविष्य निर्वाह योजनेमध्ये ७० लाख लोकांची नोंदणी करुन घेतली, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या अशी अनेक चांगली कामे माझ्या सरकारने केली आहेत.मी निवडणुकांबद्दल विचार करत बसत नाही व माझा वेळ फुकट घालवत नाही.