लखनौ : इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी अशा वाहनांवरील रोड टॅक्समध्ये मोठी सवलत देण्याचा निर्णय उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली.मुख्यमंत्री आदित्याथ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाची माहिती सरकारचे प्रवक्ते तथा मंत्री सिद्धार्थनाथ सिंग यांनी पत्रकारांना दिली. त्यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक वाहनांंच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी रोड टॅक्समध्ये सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी नियमांत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. दुचाकी वाहनांना रोड टॅक्समध्ये १00 टक्के, तर चारचाकी वाहनांना ७५ टक्के सूट देण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या दंडामध्ये वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. यात चुकीच्या पार्किंगसाठी पहिल्या गुन्ह्यास ५00 रुपये आणि दुसऱ्या गुन्ह्यास १,५00 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सिंग यांनी सांगितले की, इतरही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतले आहेत. लष्कर आणि निमलष्करी दलातील शहीद जवानांच्या पत्नी आणि कुटुंबियांना आता राज्य सरकारकडून ५0 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. आधी ही रक्कम २५ लाख रुपये होती. या निर्णयाचे संपूर्ण मंत्रिमंडळाने स्वागत केले. सिंग यांनी सांगितले की, मिर्झापूरमधील देवरी गावातील ६.५0 एकर जमीन केंद्र सरकारला नि:शुल्क देण्याचा निर्णय घेण्यात आला. या जागेवर केंद्रीय विद्यालय बनणार आहे.शासकीय कामात अडथळा आणल्यास २ हजार रुपये, तर सत्य लपवून परवाना मिळाल्यास १0 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. विनाहेल्मेट गाडी चालविल्यास आता १ हजार रुपये दंड लागेल.अग्निशामक दलाची वाहने आणि रुग्णवाहिका यांना रस्ता न दिल्यास १0 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना रोड टॅक्समध्ये उत्तर प्रदेशात मिळणार सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 12:53 AM