जमशेदपूर, दि. 14 - तुमच्या घराचं एका महिन्याचं वीज बिल हजार किंवा लाखात नाही तर अब्जावधीत आलं तर...झारखंडच्या जमशेदपूरमध्ये एका व्यक्तीला तब्बल 38 अब्ज वीज बिल आलं आहे. इतकंच नाही तर बीलाची रक्कम न भरल्यानं त्याच्या घराची वीज जोडणीही तोडण्यात आली आहे.
जमशेदपूरमध्ये वास्तव्य करणाऱ्या बी. आर. गुहा यांना एक महिन्याचं वीज बिल 38 अब्ज रूपये आलं आहे. आमच्या घरात तीन खोल्या आहेत, ज्यामध्ये तीन पंखे, तीन ट्युबलाईट आणि एक टीव्ही इतक्याच उपकरणांचा वापर केला जातो, असं असतानाही इतकं बिल कसं काय येऊ शकतं? हे समजायला मार्ग नाही असं गुहा म्हणाले. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.
इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडे याबाबत आम्ही तक्रार केली आहे. माझ्या आईला मधुमेहाचा आजार आहे आणि वडिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. आलेलं एवढं बिल पाहून दोघंही चक्रावून गेले होते. अशी प्रतिक्रिया गुहा यांच्या मुलीनं दिली आहे. या प्रकरणाची तक्रार आली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे, वीज बिलात गडबड असेल तर सुधारणा केली जाईल, असं झारखंड इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या अधिका-यांनी म्हटलं आहे.
यापूर्वीही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. 2014 मध्ये हरियाणात एका पानवाल्याला कोट्यवधीचं वीज बिल आलं होतं. राजेश सोनीपत असं या पानवाल्याचं नाव होतं. त्याला 132 कोटी वीज बिल आलं होतं. दरम्यान, इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.