आणीबाणी! लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढणाऱ्यांना विसरणार नाही- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 03:44 AM2020-06-26T03:44:08+5:302020-06-26T07:00:45+5:30
मोदी म्हणाले की, १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी केवळ लोकशाहीसाठी मतदान केले होते.
नवी दिल्ली : आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या संरक्षणासाठी झटणा-या लोकांना देश कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गौरवोद्गार काढले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी घोषित केली होती. मोदी यांनी टष्ट्वीट केले की, ४५ वर्षांपूर्वी देशावर आणीबाणी थोपविण्यात आली. त्यावेळी लोकशाहीच्या संरक्षणासाठी ज्या लोकांनी संघर्ष केला, यातना सहन केल्या त्या सर्वांना माझे शतशत नमन. त्यांचा त्याग आणि बलिदान देश कधीही विसरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ची जून २०१९ ची एक क्लिपही शेअर केली आहे. यात आणीबाणीचा हवाला देण्यात आला आहे. मोदी म्हणाले की, १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी केवळ लोकशाहीसाठी मतदान केले होते.
>‘एका कुटुंबाचे हित राष्ट्रीय हितावर वरचढ’
एकाच कुटुंबाचे हित पक्ष आणि राष्ट्रीय हितावर वरचढ ठरत आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यांनी असा सवाल केला की, आणीबाणीची मानसिकता आजही काँग्रेसमध्ये का आहे? अमित शहा यांनी गुरुवारी एकानंतर एक टष्ट्वीट केले आणि असा दावा केला की, काँग्रेसच्या नेत्यांना आपल्याच पक्षात गुदमरल्यासारखे होत आहे.
हा पक्ष जनतेपासून दूर जात आहे. शहा म्हणाले की, ४५ वर्षांपूर्वी एका कुटुंबाच्या सत्तेच्या लालसेने देशावर आणीबाणी थोपली होती. रात्रीतून देश कैदखान्यात रूपांतरित झाला होता.