श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे बुधवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली(Jammu Kashmir Encounter). यात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. पुलवामातील राजपुरा भागात ही चकमक झाली. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक जैश-ए-मोहम्मदचा कमांडर आहे तर दुसरा परदेशी दहशतवादी आहे.
काश्मीरच्या आयजीने एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर यासिर परे मारला गेला आहे. तो आयईडी तज्ञ होता. यासोबतच चकमकीत फुरकान नावाचा विदेशी दहशतवादीही मारला गेला. दोघांनी अनेक गंभीर दहशतवादी घटना घडवून आणल्या होत्या.
नेमकं काय घडलं ?पुलवामामधील राजपुरा येथील कसबयार गावात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिलाली होती. यानंतर जवानांनी गावाला वेढा घालून सकाळी शोध मोहीम सुरू केली असता एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले. शोध मोहीम अजूनही सुरू आहे.
तीन वर्षांत 1034 दहशतवादी हल्ले, 177 जवानांना हौतात्ममागील तीन वर्षांत देशभरात एकूण 1034 दहशतवादी हल्ले झाले व यामध्ये 177 जवान शहीद झाले. यातील 1033 हल्ले जम्मू-काश्मीरमध्ये झाले, तर एक हल्ला दिल्लीत झाला. राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी विचारलेल्या एका लिखीत प्रश्नाच्या उत्तरात संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी ही माहिती दिली.