देशात सर्वांना समान संधी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यघटना उत्तम मार्गदर्शन करणारा दस्तावेज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 05:53 AM2023-08-15T05:53:09+5:302023-08-15T05:54:12+5:30

भारताचा नागरिक असणे ही सर्वांत श्रेष्ठ ओळख आहे. भारत लोकशाहीची जननी आहे.

equal opportunity for all in the country said president draupadi murmu constitution is the best guiding document | देशात सर्वांना समान संधी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यघटना उत्तम मार्गदर्शन करणारा दस्तावेज

देशात सर्वांना समान संधी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यघटना उत्तम मार्गदर्शन करणारा दस्तावेज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतात अनेक गोष्टींमध्ये वैविध्य असूनही सर्व भारतीयांना समान संधी, अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. भारताची राज्यघटना हा उत्तम मार्गदर्शन करणारा दस्तावेज आहे. नागरिकांनी सलोखा, बंधुत्वाची भावना कायम ठेवून देशाची प्रगती साधली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.  

७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून दिलेल्या संदेशात द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे की, भारतात जात, पंथ, धर्म, भाषा, प्रदेश, कुटुंब, पेशा, अशा गोष्टींमुळे प्रत्येकाला वेगळी ओळख मिळाली आहे; पण या सर्वांपेक्षा भारताचा नागरिक असणे ही सर्वांत श्रेष्ठ ओळख आहे. भारत लोकशाहीची जननी आहे.

 प्राचीन काळापासून भारतामध्ये लोकशाही परंपरा जपणाऱ्या संस्था अस्तित्वात होत्या. ब्रिटिशांच्या राजवटीत या संस्था नष्ट करण्याचे काम करण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाल्यावर भारतात नवी पहाट अवतरली. भारताला केवळ विदेशी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले नाही, तर स्वत:चे नशीब उजळ करण्याची पुन्हा संधी मिळाली. 

हवामान बदलाकडे तातडीने लक्ष द्या

वारंवार येणारे पूर, काही ठिकाणी पडणारे दुष्काळ ज्यामुळे होतात त्या हवामान बदल व ग्लोबल वॉर्मिंग या दोन गोष्टींकडे शास्त्रज्ञ व धोरणकर्त्यांनी तातडीने लक्ष दिले पाहिजे. जी-२० गटातील देश जगातील तीन चतुर्थांश प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात. या संघटनेच्या अध्यक्षस्थानी भारत आहे. जागतिक प्रश्न सोडविण्यासाठी भारत मोठी भूमिका बजावणार आहे, असेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

सरकारने महागाईला ठेवले नियंत्रणात

जागतिक स्तरावरील महागाई हा सर्वांसमोरील चिंतेचा विषय आहे. मात्र, भारतातील केंद्र सरकार, रिझर्व्ह बँकेने या महागाईवर नियंत्रण राखण्यात यश मिळविले आहे. देशातल्या दुर्बल गटातील लोकांसाठी केंद्र सरकारने विविध योजना राबविल्या. त्याच्या परिणामी अनेक लोकांची गरिबीपासून मुक्तता झाली आहे. देशातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अमलात आणले. 

चंद्रयान-३ महत्त्वाचा टप्पा

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, येत्या काही दिवसांत चंद्रयान-३ वरील विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर हे चंद्राच्या पृष्ठभागावर दाखल होतील. चंद्रयान मोहीम ही भारताच्या आगामी अवकाश मोहिमांमधील महत्त्वाचा टप्पा आहे. अवकाश संशोधनात भारताला आणखी खूप प्रगती करायची आहे. केंद्र सरकारने अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली आहे. त्यासाठी ५० हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

महिलांच्या आर्थिक सबलीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर त्याचा फायदा कुटुंब व देशाला होतो. त्यामुळे या मुद्याकडे नागरिकांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. देशाच्या प्रत्येक क्षेत्रातील विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.

 

Web Title: equal opportunity for all in the country said president draupadi murmu constitution is the best guiding document

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.