नवी दिल्ली : देशामध्ये महिलांच्या अधिकारावर सगळेच पक्ष बोलत असतात. मात्र, निवडणुकीमध्ये तिकिट देताना महिलांकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येते. यामुळे महिलांची संख्या राजकीय क्षेत्रात हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच असते. ही अडचण ओळखून आज दिल्लीमध्ये केवळ महिलांसाठीच एक वेगळा पक्ष स्थापन करण्यात आला. या पक्षाचे नाव राष्ट्रीय महिला पार्टी असे आहे. या पक्षाची स्थापना एका 36 वर्षीय डॉक्टरने केली आहे.
राष्ट्रीय महिला पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्वेता शेट्टी या आहेत. त्यांनी सांगितले की, आज संसदेत महिलांच्या आरक्षणावर सर्वच बोलतात, मात्र कृती करत नाहीत. यामुळे आमचा पक्ष याविरोधात लढणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या शोषणावरही आवाज उठविणार आहे. यासाठीच केवळ महिलांसाठी वेगळा पक्ष काढण्यात आला आहे.
2019 मध्ये लोकसभा निवडणुकाही लढविण्यात येणार असून राजकीय क्षेत्रातील पुरुषांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी महिलांचा पक्ष असणे गरजेचे आहे. वंचित महिलांना प्रतिनिधित्व मिळायला हवे.